अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा सुरु असतानाच शरद पवार आणि मंत्री उदय सामंत यांच्यात उद्या भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची उद्या भेट होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये आज फोनवही चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांची उद्या प्रत्यक्ष भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा सुरु असतानाच शरद पवार आणि मंत्री उदय सामंत यांच्यात उद्या भेट
| Edited By: | Updated on: Apr 25, 2023 | 10:32 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री पदाबद्दल वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यात अजित पवार यांनी आपण 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय तर आताच मुख्यमंत्री पदासाठी दावा करु शकतो, असं मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे पुन्हा याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीची भाजप विरोधातील भूमिका मवाळ झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना उद्या दोन मोठ्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट होणार आहे. या भेटीला महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्त्व असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची उद्या भेट होणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये आज फोनवही चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांची उद्या प्रत्यक्ष भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांची उद्या सकाळी 10 वाजता भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीमध्ये बारसू आंदोलनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पवार आणि सामंत यांच्यात फोनवर याचविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर याच विषयावर उद्या प्रत्यक्ष भेट होऊन चर्चा होण्याची शक्यता आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी आज सर्व्हेक्षण सुरु झालं. पण या सर्व्हेक्षणाला काही स्थानिकांनी विरोध केला. विशेष म्हणजे काही महिला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं. या प्रकरणावर शरद पवार यांनी भूमिका मांडलीय. “राज्यात उद्योग वाढीस लागायला हवा. मात्र उद्योग ज्या ठिकाणी उभारणार आहेत त्याठिकाणच्या स्थानिकांचे मत देखील विचारात घ्यायला हवे. सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन विषय सोडवावा, अशी भूमिका शरद पवार यांनी या प्रकरणावर मांडली आहे. त्यानंतर उद्या उदय सामंत आणि शरद पवार यांची भेट होणार आहे.

ठाकरे गट आंदोलन उभं करणार

एकीककडे शरद पवार सरकारसोबत रिफायनरी प्रकल्पावरुन चर्चा करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटात वेगळ्या हालचाली घडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, तसेच काय निर्णय घेण्यात आले, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ठाकरे गट कोकणात मोठं आंदोलन उभारणार आहे. कोणत्याही परिस्थितीत बारसू सोलगाव रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांसोबत ठाम राहायचं, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

रिफायनरीला विरोध म्हणून मोठं जन आंदोलन उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत स्थानिकांसोबत कायम राहण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रकल्पाला रद्द करण्यासाठी किंवा स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत जाऊन कोणाशी चर्चा करण्यात अर्थ नाही. लोकांसोबत राहूयात, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.