RSS च्या लोकांसारखी चिकाटी हवी, त्यांच्याकडून शिका : पवार

| Updated on: Jun 06, 2019 | 12:56 PM

"मी कुठलाही उमेदवार जाहीर करणार नाही. पण नवीन चेहरे शोधा आणि तरुण उमेदवार शोधा."

RSS च्या लोकांसारखी चिकाटी हवी, त्यांच्याकडून शिका : पवार
Follow us on

भोसरी : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आता आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे. याचअंतर्गत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्यातील भोसरीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) लोकांसारखी चिकाटी हवी, त्यांच्याकडून जनसंपर्क कसं करायचं ते शिका, असा सल्ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

पवारांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांना RSS चे धडे

“आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले, अन् एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातो, पण त्या घरी जाऊनच येतो. संपर्कात कसं राहावं हे आरएसएस करतं. असं मला एका खासदाराने सांगितले.”, असे शरद पवार यांनी भोसरीत राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

आतापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवं. असं भेटलात, तर ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत, असा सल्ला पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

वाचा : आता लक्ष्य विधानसभा, पवार मैदानात, भोसरीपासून सुरुवात

आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे सांगताना शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या शिरुरमधील विजयाबद्दल पदाधिकाऱ्यांचे आभारही मानले.

विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “मी कुठलाही उमेदवार जाहीर करणार नाही. पण नवीन चेहरे शोधा आणि तरुण उमेदवार शोधा.”

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या कार्यपद्धतीचे उदाहरण दिल्याने, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता भाजप किंवा इतर पक्षांच्या गोटातून शरद पवारांच्या या वक्तव्याबद्दल काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.