चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, सर्व पदांचा राजीनामा

| Updated on: Jul 27, 2019 | 7:25 PM

चित्रा वाघ (Chitra wagh) यांच्यासह इतर काही जण भाजप प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे काही आमदार आणि चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालंय.

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, सर्व पदांचा राजीनामा
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. चित्रा वाघ (Chitra wagh) यांच्यासह इतर काही जण भाजप प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे काही आमदार आणि चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालंय.

येत्या 30 जुलै रोजी राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

अगोदर राष्ट्रवादीत असलेले भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय. कर्नाटकच्या आमदारांची जबाबदारी प्रसाद लाड यांनी यशस्वीपणे निभावल्यानंतर आणखी एक मोहिम फत्ते केल्याची माहिती आहे.

दरम्यान, फक्त राष्ट्रवादीच नव्हे, तर काँग्रेसचीही गळती सुरुच आहे. 30 जुलैला कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मधुकर पिचड यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही भाजपात जात असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विदर्भातही राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती सुरुच आहे. मुंबई अध्यक्ष सचिन अहिरयांच्यानंतर आता राष्ट्रवादीला विदर्भात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक (Manohar Naik) यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक यांचा शिवसेना प्रवेश जवळपास पक्का मानला जातोय. मनोहर नाईक (Manohar Naik) हे राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे नाईक घराण्याच्या रुपाने राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे.