Prashant Kishor | निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री! बिहारमधून सुरुवात, कोणत्या पक्षात जाणार?

| Updated on: May 02, 2022 | 2:48 PM

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठीही त्यांनी निवडणूक अभियानात यशस्वी कामगिरी केली होती. त्यानंतरच त्यांचं नाव जास्त चर्चेत आलं. मागील दहा वर्षांपासून निवडणूक रणनितीकार म्हणून कामगिरी बजावणारे प्रशांत किशोर आता कोणत्या पक्षात जातील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Prashant Kishor | निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री! बिहारमधून सुरुवात, कोणत्या पक्षात जाणार?
प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर
Follow us on

नवी दिल्ली | प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी याविषय़ीचे ट्वीट केले. आपण आता जनतेच्या दरबारात जाण्यासाठी तयार आहोत.बिहार (Bihar) या होमटाऊनमधून राजकारणाची सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी या ट्वीटमधून सांगितलं आहे. मागील वर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीत (Election) यशस्वी कामगिरी केल्यानंतर त्यांनी मे 2022 मध्ये पुढील पाऊल उचलणार.. अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आज ट्वीट केले. ‘ लोकशाहीत अर्थपूर्ण रितीने सहभागी होत तसेच लोकाभिमुख धोरण तयार करण्यात मदत करण्याचे माझे 10 वर्षांचे प्रयत्न होते. ही चढ-उतारांची रोलर कोस्टर राइड होती. आता काळ पुढे जात असून रिअल मास्टर्सकडे जाण्याची वेळ आली आहे. समस्या आणि ‘जन सुराज’चा मार्ग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लोकांपर्यंत जाण्याची ही वेळ आहे,’ अशा आशयाचं ट्वीट प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

कोण आहेत प्रशांत किशोर?

मूळ बिहार येथील रहिवासी असलेले प्रशांत कुमार एक प्रसिद्ध रणनितीकार आहेत. 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत राजद-जद (यू)- काँग्रेसच्या महाआघाडीच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर 2017 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, 2019 मधील आंध्र विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्ष, 2020 मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुकसाठी त्यांनी काम केले होते. या निवडणुकांमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी केली. 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी त्यांनी निवडणूक रणनितीकार म्हणून काम केले. मात्र त्यात ते अपयशी ठरले.

कोणत्या पक्षात जाणार?

प्रशांत किशोर आता नव्या पक्षाची घोषणा करणार की राजकारणात सक्रिय असलेल्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी त्यांनी काही काळ जनता दलात (युनायटेड) प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर ते बाहेर पडले. ते जदयूमध्ये पुन्हा एंट्री करतील अशाही चर्चा आहेत. मागील आठवड्यातच त्यांनी काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठीही त्यांनी निवडणूक अभियानात यशस्वी कामगिरी केली होती. त्यानंतरच त्यांचं नाव जास्त चर्चेत आलं. मागील दहा वर्षांपासून निवडणूक रणनितीकार म्हणून कामगिरी बजावणारे प्रशांत किशोर आता कोणत्या पक्षात जातील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.