मोठी बातमीः संसदेत अदानी प्रकरणावरून गोंधळ, ‘महाघोटाळ्याची चौकशी करा’, विरोधकांची मागणी, काय update?

हिंडनबर्गच्या रिपोर्टमधील दावे तपासून पहावेत, अदानींनी देशात महाघोटाळा केला असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

मोठी बातमीः संसदेत अदानी प्रकरणावरून गोंधळ, महाघोटाळ्याची चौकशी करा, विरोधकांची मागणी, काय update?
विरोधी पक्षांची बैठक
Image Credit source: social media
| Updated on: Feb 02, 2023 | 12:54 PM

नवी दिल्लीः अदानी समूहाविरोधात (Adani Group) हिंडनबर्ग (Hindenburg) रिसर्च संस्थेने केलेल्या दाव्यांचे पडसाद आज संसदेत उमटले. राजधानी दिल्लीत सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आगामी वित्तवर्षाचा अर्थसंकल्प देशासमोर सादर केला. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सदनात प्रचंड गदारोळ सुरु झाला. अदानी ग्रुपवर अमेरिकन रिसर्च एजन्सीने लावलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा महाघोटाळा आहे, असा आरोप करत विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत संसदेच्या दोन्ही सदनाची कार्यवाही स्थगित करण्यात आली.

आज संसदेत काय घडलं?

– संसदेत आज आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अदानी प्रकरणावरून आरोप केले. अदानी हे पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय असल्याने ते या मुद्द्यावर शांत आहेत. अमृतकाळातील हा महाघोटाळा आहे, असे आरोप त्यांनी केले.

– काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले, सर्व पक्षांच्या नेत्यांनी मिळून एक निर्णय घेतलाय. देशात ज्या आर्थिक घटना होतायत, त्याविरोधात सदनात आवाज उठवणार आहोत. त्यामुळे आम्हीही एक नोटीस दिली होती. आम्हाला या विषयावर चर्चा हवी होती, मात्र जेव्हा जेव्हा नोटिस दिली जाते, ती रिजेक्ट केली जाते…
यावरून विरोधकांनी संसदेत गोंधळ सुरु केला.

CJI ची मागणी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CJI च्या देखरेखीखाली एक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. ही समिती दररोज रिपोर्ट सादर करेल. एलआयसी, एसबीआय आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गुंतवणूक करून लोकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. त्यांच्या गुंतवणुकीचं काय, असा सवाल मल्लिकार्जून खरगे यांनी केलाय.

काय आहे अदानी प्रकरण?

अमेरिकेतील रिसर्च कंपनी हिंडनबर्गने नुकताच एक रिपोर्ट जारी केलाय. भारतातील अदानी समूहावर या रिपोर्टमध्ये फसवणुकीचे आरोप केले आहेत. ३२ हजार शब्दांच्या या रिपोर्टमध्ये ८८ प्रश्नांचा समावेश आहे. अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर्समध्ये हेराफेरी आणि खातेधारकांची फसवणूक करत असल्याचा दावा हिंडनबर्गच्या या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. हा रिपोर्ट जारी झाल्यानंतर अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत.

हिंडनबर्गच्या या रिपोर्टमधील दावे तपासून पहावेत, अदानींनी देशात महाघोटाळा केला असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.