भाजपाला धक्का देणाऱ्या बिहारमध्ये नितीन गडकरी, तेजस्वी यादवांकडून तोंडभरून कौतुक, मैत्रीचा ‘तो’ किस्सा नव्याने चर्चेत!

| Updated on: Nov 15, 2022 | 10:15 AM

लालूंनी नितीन गडकरींना एक पुष्पगुच्छ दिलं. तेजस्वी यादव तेव्हाही उपमुख्यमंत्री होते....

भाजपाला धक्का देणाऱ्या बिहारमध्ये नितीन गडकरी, तेजस्वी यादवांकडून तोंडभरून कौतुक, मैत्रीचा तो किस्सा नव्याने चर्चेत!
Image Credit source: social media
Follow us on

पाटणाः बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपाला दूर सारत राष्ट्रीय जनता दलाशी (RJD)हातमिळवणी केली. त्यानंतर आरजेडी-जदयूचे नेते संधी मिळेल तेथे एकमेकांवर टीका करत असतात. पण नितीन गडकरींची (Nitin Gadkari) बातच काही और आहे. फक्त काम, विश्वासातून मनं जिंकणाऱ्या नितीन गडकरींबाबत राजकीय हेवे-दावे द्वेष वगैरे या गोष्टी लागू होत नाहीत, असंच पुन्हा एकदा दिसून आलंय.

बिहारमध्ये रोहतास येथील एका कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते. तेजस्वी हे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव. या दोघांनीही एकमेकांची एवढी तारीफ केली की तेजस्वी यादव यांचे कार्यकर्तेही चक्रावून गेले.

रोहतास जिल्ह्यात झारखंडला जोडणाऱ्या पूलाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात भाषणात बोलताना नितीन गडकरींचं कौतुक करताना तेजस्वी यादव म्हणाले, केंद्रात गडकरींसारखे मंत्री असायला हवेत. जोपर्यंत तुम्ही मंत्री आहात, तोपर्यंत मला फार विचार करण्याची गरज नाही..’

तेजस्वी यादव म्हणाले, मी तुमच्या कार्यपद्धतीचा चाहता आहे. तुमच्याकडून खूप काही शिकत असतो. नितीन गडकरी विकसात्मक आणि प्रगतीशील विचारसरचणीचे आहेत. केंद्रात सगळेच मंत्री गडकरींसारखे झाले तर विकास झपाट्याने होईल.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले, नितीन गडकरी आधीपासूनच बिहारवर विशेष लक्ष देतात. ते जोपर्यंत मंत्री आहेत, तोपर्यंत मला फार चिंता नाही.

तर प्रत्युत्तरादाखल नितीन गडकरी यांनीही तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. तेजस्वी यादव यांनी बिहारच्या रस्ते वाहतुकीसाठी आणखी योजना आणल्या तर केंद्राकडून त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल..

यानिमित्ताने तेजस्वी यादव आणि नितीन गडकरी यांच्या जुन्या मैत्रीचा किस्साही पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तो दिवस होता 20 एप्रिल2016 चा. लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव आणि नितीन गडकरींची भेट घालून दिली होती.

लालूंनी नितीन गडकरींना एक पुष्पगुच्छ दिलं. तेजस्वी यादव तेव्हाही उपमुख्यमंत्री होते. पण लालूप्रसाद यादव त्यांना राजकारणाचे धडे गिरवत होते. त्याच काळातला हा किस्सा आहे. लालूंनी दिलेली ती शिकवण तेजस्वी यांनी आजही लक्षात ठेवली असून तोच धागा पकडून त्यांनी गडकरी यांचं कौतुक केलं.

बिहारमधील सोन नदीवर पंडुका ब्रीज उभारला जाणार आहे. 210 कोटी रुपये बजेट असलेल्या या विकासकामाचे भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. नितीन गडकरी म्हणाले, बिहारमध्ये येत्या काही वर्षात अनेक एक्सप्रेस वे बनतील. तसेच कनेक्टिव्हिटीदेखील वाढेल.