राष्ट्रवादीच्या उस्मानाबादच्या उमेदवाराचं उत्पन्न 56 टक्क्यांनी वाढलं, कमाईचा स्रोत – शेती

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबादचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं उत्पन्न गेल्या एक वर्षात तब्बल 25 टक्क्याने वाढलंय, तर 5 वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न 56 टक्क्यांनी वाढलंय. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली. आमदार राणा यांचं उत्पन्न 2013-14 मध्ये 6 लाख 47 हजार 940 रुपये आणि 2016-17 मध्ये 14 लाख […]

राष्ट्रवादीच्या उस्मानाबादच्या उमेदवाराचं उत्पन्न 56 टक्क्यांनी वाढलं, कमाईचा स्रोत - शेती
Follow us on

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबादचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं उत्पन्न गेल्या एक वर्षात तब्बल 25 टक्क्याने वाढलंय, तर 5 वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न 56 टक्क्यांनी वाढलंय. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली. आमदार राणा यांचं उत्पन्न 2013-14 मध्ये 6 लाख 47 हजार 940 रुपये आणि 2016-17 मध्ये 14 लाख 19 हजार होतं. मात्र 2017-18 मध्ये त्यांचं उत्पन्न 3 कोटी 64 लाख इतकं झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न 3 कोटी 50 लाख रुपयांनी जास्त आहे.

विशेष म्हणजे आमदार पाटील यांचा उत्पन्नाचा स्त्रोत हा शेती दाखवलाय. कायम दुष्काळग्रस्त भाग अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांनी अशी कोणती शेती केली, की त्यापासून एका वर्षात कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळाले हा संशोधनाचा विषय आहे.

आमदार पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात त्यांनी 2013 ते 2018 या काळातील उत्पन्नाची माहिती दिली आहे. यात त्यांचे 2013 मध्ये उत्पन्न 6 लाख 47 हजार 940 रुपये होते, तर 2018 मध्ये ते 3 कोटी 64 लाख 4 हजार 840 रुपये इतके झाले. म्हणजे आमदार राणा पाटील यांचे उत्पन्न गेल्या 5 वर्षात तब्बल 56 टक्क्यांनी वाढले.

पाटील यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या उत्पन्नात सरासरी वाढ झाली आहे. त्यांचं उत्पन्न 2016-17 मध्ये 9 लाख 50 हजार होतं, तर 2017-18 मध्ये 12 लाख 37 हजार राहिलं.

आमदार राणा यांची पत्नी अर्चना पाटील यांच्याकडे 1 कोटी 4 लाख रुपयांचे 3 किलोपेक्षा अधिक विविध प्रकारचे सोन्याचे दागिने आहेत, तर ओमराजे निंबाळकर यांच्या पत्नी संयोजनी यांच्याकडे 9 लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे अलंकार आहेत.

ओमराजे यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी या दुहेरी हत्याकांडानंतर डॉ. पद्मसिंह पाटील आणि राजे निंबाळकर परिवार एकमेकांचे हाडवैरी बनले आहेत. या दोन्ही परिवारांनी सत्ता संघर्षात एकमेकांचा पराभव केला. या लोकसभा निवडणुकीतही या दोन्ही कुटुंबाचीच लढत होणार आहे.