बापू, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या, महाराष्ट्र मनोरंजन दौरा बंद करा, शहाजी पाटलांना झोंबणारे शब्द कुणाचे?

| Updated on: Sep 01, 2022 | 1:01 PM

मातोश्रीवर सुख समृद्धी दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं काल शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं. आज त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळालं.

बापू, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या, महाराष्ट्र मनोरंजन दौरा बंद करा, शहाजी पाटलांना झोंबणारे शब्द कुणाचे?
शहाजी बापू पाटील, आमदार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पंढरपूर | काय झाडी, काय डोंगर या डायलॉगवरून प्रसिद्ध झालेल्या शहाजी पाटलांवर (Shahaji Bapu Patil) शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्याने अक्षरशः झोंबणारी टीका केली आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समदं कसं ओके…. आहे तर आधी याच खोक्यातून बायकोसाठी साडी घेऊन या असा सल्ला पदाधिकाऱ्याने दिलाय. पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले (Ganesh Ingole) यांनी सोशल मीडियातून शहाजी बापू पाटलांना हे प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडियात त्यांची ही पोस्ट तुफ्फान व्हायरल होतेय.

साडीवरून टीका का?

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर काय झाडी, काय डोंगर हा त्यांचा डायलॉग फेमस झाला. अनेक ठिकाणी मुलाखती झाल्या. आमदार असून निधी कमी पडतोय, खूप गरीबीत राहतोय, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यातच किती दिवस झाले, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळेच पंढरपूरच्या युवासेना नेत्यानं त्यांना आधी ती साडी घेऊन या असा सल्ला दिलाय. त्यातच काल गणरायासमोर काय साकडं घातलं, यावर विचारलं असता मातोश्रीवर सुख समृद्धी दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी म्हटलं. यावर त्यांना शिवसेनेतून प्रत्युत्तर मिळालंय.

सोशल मीडियातून अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत..

इंगोले यांची पोस्ट काय?

युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोले यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समंद कसं ओके…. बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल..आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वतःच घर पूर्ण करा. स्वतःच्या बायकोला 50 खोक्यातून साडी घेऊन द्या, अशी बोचरी टीका करणाऱ्या पोष्ट सोशल मीडियात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पंढरपूरात शिंदेसेना-शिवसेना वाद पेटणार?

एकाच डायलॉगने प्रसिद्ध झालेल्या शहाजी बापू पाटील आता जणू शिंदे सेनेचे ब्रँड झालेत. त्यामुळे विविध ठिकाणी भाषण करताना ते डायलॉग तर मारतातच, शिवाय शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका केली. या टिकेमुळे दुखावलेले शिवसेनेचे पदाधिकारी आता त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे सोलापूर-पंढरपूरात दोन गटातील शिवसेनेचा वाद चांगलाच उफाळून येणार असं दिसतंय.