बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीआधीच पंकजा मुंडेंना पराभव मान्य

| Updated on: Jan 04, 2020 | 2:50 PM

'लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत' असं ट्वीट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदान सोडलं

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीआधीच पंकजा मुंडेंना पराभव मान्य
Follow us on

बीड : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच भाजपने पराभव स्वीकारला आहे. ‘लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्वीट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदान सोडलं (Pankaja Munde accepts defeat). आज फक्त मतदान पार पडणार आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे निकाल 13 जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे.

‘राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही आहे. रात्रीच, बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्वीट पंकजा यांनी केलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारल्याचं दिसत आहे.

आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्याची कबुली खुद्द भाजप खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी दिली आहे. परळी विधानसभेपाठोपाठ बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर पराभवाची नामुष्की ओढावणार आहे.

आमच्याकडे पर्याप्त संख्याबळ नाही. तरीही आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीला सामोरे जात आहोत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला इकडेही यशस्वी होत आहे. आम्ही जिल्ह्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

कालपर्यंत शिवसेना आमच्यासोबत होती, आज मात्र नाही. पंकजा मुंडे शरीराने इथे नाहीत पण मनाने आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व होत आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली. अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर मी काही बोलणार नाही, मी जिल्हा परिषद निवडणुकीत व्यस्त आहे, असं म्हणत प्रीतम मुंडेंनी सत्तारांविषयी बोलणं टाळलं.

बीड जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक : पंकजा मुंडे परदेशात, प्रीतम मुंडेंवर जबाबदारी

पंकजा मुंडे या सध्या परदेशात आहे. त्यांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे सोपवली आहे. तर शिवसंग्राम संघटनेच्या विनायक मेंटेंनी आपल्या सदस्यांना व्हीप बजावला.

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत काट्याची टक्कर होत असताना, बीडच्या नेत्या पंकजा मुंडे परदेशात असल्याने त्यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे नाहीत.  नेमकं याचवेळी परदेश दौऱ्याने मतदारसंघात कुजबूज सुरु आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औरंगाबाद येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्या शिवकन्या सिरसाठ यांचे नाव अध्यक्षपदासाठी तर नागरगावचे जिल्हा परिषद सदस्य जयसिंह सोळंके यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. जयसिंह सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत.

बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल –

  • राष्ट्रवादी काँग्रेस – 19
  • काँग्रेस – 03
  • भाजपा – 19
  • शिवसेना – 04
  • काकू – नाना आघाडी – 02
  • अपक्ष – 02
  • शिवसंग्राम – 04 ( मात्र सर्व सदस्य भाजपवासी झालेत)

    Pankaja Munde accepts defeat