सत्ताधारी पक्षात असूनही पंकजा मुंडे का म्हणतायेत ‘बेरोजगार’?

| Updated on: Sep 29, 2022 | 3:15 PM

परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा मोहत्सवात पंकजा मुंडे बोलत होत्या.

सत्ताधारी पक्षात असूनही पंकजा मुंडे का म्हणतायेत बेरोजगार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

 महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः सत्ताधारी पक्षात असूनही पंकजा मुंडे यांनी मी बेरोजगार (Unemployed) असल्याचं बोलून दाखवलंय. तेसुद्धा बीडमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात. विजयादशमीला सर्वत्र शस्त्रांची पूजा केली जाते. पण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी तर आपण बेरोजगार असल्याचं स्पष्ट सांगत दसऱ्याआधीच नवं शस्त्र उगारल्याचं म्हटलं जातंय. बीडमधील नवरात्रोत्सवात (Navratri) पंकजा मुंडे बोलत होत्या.

झालं असं की, भाषणापूर्वी पंकजा मुंडे यांच्या एका कार्यकर्त्याने त्यांना काम मिळावं अशी मागणी केली. देवीच्या कानात सांगितलं, पंकजा ताईंना सांग मला काम दे म्हणून… हाच मुद्दा घेऊन पंकजा मुंडेंनी भाषण सुरु केलं.

त्या पुढे म्हणाल्या, ‘ गुलचंद दादांनी देवीच्या कानात सांगितलं.. ताईला सांगा मला काही काम द्या. पण मी जर कुणाला काम देऊ शकते म्हणजे मला काम मिळेल. पण सध्या मी बेरोजगार आहे…

पंकजा मुंडे म्हणाल्या मी बेरोजगार पहा….

त्यानंतरही त्या थांबल्या नाहीत. एक सूचक वक्तव्य करत त्या म्हणाल्या, मला गूलचंद दादांची प्रार्थना आवडली. म्हणजे एक तीर में दो शिकार… त्यांना काम मिळेल म्हणजे त्याआधी मला काम मिळेल. म्हणून तुम्ही देवीच्या कानात सांगितलं पंकजा ताईंना सांग मला काम दे म्हणून…. असं त्या म्हणाल्या.

सत्ताधारी पक्षात असूनही आपण बेरोजगार असल्याचं पंकजांनी सांगणं, यातून पुन्हा एकदा त्यांची नाराजी तर दिसून येत नाहीये नं, अशी चर्चा सुरु आहे.

परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा मोहत्सवात पंकजा मुंडे बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी यावेळी सोशल मीडियावरील ट्रोलर्सवर जोरदार टीका केली.

त्या म्हणाल्या, आजचं युद्ध सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. असं चाललंय.

पण आपण यामध्ये बसत नाही. त्यामुळे एकच मार्ग आहे. आम्ही सगळे आपापलं काम करत असतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एका वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांना सोशल मीडियावर दोन दिवस तुफान ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला.