पुण्यातून काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने प्रवीण गायकवाड नाराज?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

पुणे : महाराष्ट्र सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या दोनच दिवसात नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांना डावलून, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रवीण गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पुण्यातील कालच्या बैठकीकडे प्रवीण गायकवाड यांनी पाठ […]

पुण्यातून काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने प्रवीण गायकवाड नाराज?
Follow us on

पुणे : महाराष्ट्र सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या दोनच दिवसात नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांना डावलून, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रवीण गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पुण्यातील कालच्या बैठकीकडे प्रवीण गायकवाड यांनी पाठ फिरवली. या घटनेमुळे प्रवीण गायकवाड नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

प्रवीण गायकवाड हे पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांना पुण्यातून उमेदवारी दिली. त्यामुळे प्रवीण गायकवाड यांचे समर्थक नाराज झाले होते. प्रवीण गायकवाड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, अशीही मागणी त्यांच्या समर्थकांची होती. मात्र, या सर्व गोष्टींवर स्वत: प्रवीण गायकवाड यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही.

प्रवीण गायकवाड कोण आहेत?

प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील नेते आहेत. महाराष्ट्र सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी मध्यंतरी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता. मात्र, शेकापमधून बाहेर पडून, ते पुन्हा संघटनात्मक कामं करत होते. अखेर त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवीण गायकवाड यांना मानणारे लोक आहेत. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी आपलं नेतृत्त्व सिद्ध केले आहे. तरुणवर्गही मोठ्या प्रमाणात प्रवीण गायकवाड यांचा समर्थक आहे.

कोण आहेत मोहन जोशी?

  • विधान परिषदेचे माजी आमदार
  • जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
  • अध्यक्ष, महाराष्ट्र हरिजन सेवक संघ
  • 1999 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती
  • या निवडणुकीत ते 2 लाख 12 हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते
  • 1986 मध्ये ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते
  • 2007 पासून 2013 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या राज्यात निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले