‘महापौर शिवसेनेचा असावा ही पुणेकरांची इच्छा’, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य; मतविभागणी होणार नसल्याचाही दावा

| Updated on: Oct 13, 2021 | 1:07 PM

पुणे आणि पिंपरी चिंचवडला महापौर आमचा असेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. मात्र, यावेळी बोलताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही उल्लेख केला. तसंच आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करु, असंही राऊत यावेळी म्हणाले.

महापौर शिवसेनेचा असावा ही पुणेकरांची इच्छा, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य; मतविभागणी होणार नसल्याचाही दावा
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुणे महापालिका निवडणूक आणि राजकीय गणितांवर मोठं भाष्य केलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडला महापौर आमचा असेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. मात्र, यावेळी बोलताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही उल्लेख केला. तसंच आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करु, असंही राऊत यावेळी म्हणाले. पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचाही महापौर असावा अशी पुणेकरांचीच इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलंय. राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय. (Pune, Pimpri-Chinchwad next mayor will be from Shivsena, MP Sanjay Raut’s claim)

त्याचबरोबर राज्यात अनेक पॅटर्न येतात आणि जातात. पण सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला आहे. हा एक चलनी पॅटर्न आहे. दोन प्रमुख पक्ष, त्यात काँग्रेसची सोबत आली तर काय होऊ शकतं हे सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही मतांचं विभाजन होऊ देणार नाही, असा दावाही राऊत यांनी यावेळी केलाय.

बाळासाहेब ठाकरे सातत्यानं पुण्यात येत होते. आम्ही पुण्यात संघटनेचं काम करतो. तरी आमचा पुण्यात महापौर बसू शकला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची, पुणेकरांची इच्छा आहे. आमचं स्वप्न आहे की पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांवर शिवसेनेचा महापौर असावा, असंही राऊत म्हणाले.

अजुनी यौवनात मी… फडणवीसांना टोला

अजुनी यौवनात मी… असं अनेकांना वाटतं. हे नाटक रंगमंचावर फार गाजलं. तसं अनेकांना वाटतं की अजुनी यौवनात मी. मी अजूनही मुख्यमंत्री… आम्हालाही दिल्लीत गेल्यावर कधी कधी वाटतं आमचा पंतप्रधान होणार, असा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मन की बात’ केलीय. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या :

‘केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना हटवा, आरोपींना कठोर शिक्षा करुन शेतकऱ्यांना न्याय द्या’, राहुल आणि प्रियंका गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी

सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

Pune, Pimpri-Chinchwad next mayor will be from Shivsena, MP Sanjay Raut’s claim