‘रासप’मधून जानकरांनी हकालपट्टी केल्यावर आमदार राहुल कुल म्हणतात…

| Updated on: Oct 08, 2019 | 9:10 AM

महायुतीत सर्वच घटक समाधानी राहतील असं नाही. कुठे समाधान तर कुठे असमाधान असतंच, असं राहुल कुल म्हणाले. जानकरांनी मंत्रिपद देण्याचा दिलेला शब्द फिरवूनही आपण काहीच तक्रार केली नसल्याचंही ते म्हणाले.

रासपमधून जानकरांनी हकालपट्टी केल्यावर आमदार राहुल कुल म्हणतात...
Follow us on

दौंड : रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी पक्षाचे एकमेव आमदार राहुल कुल यांची हकालपट्टी केल्यानंतर आपल्याला निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया कुल (Rahul Kul on Mahadev Jankar) यांनी दिली. रासपकडून अधिकृत पत्र आलेलं नाही, मात्र रासप महायुतीतच असल्याने अडचण येणार नाही, असं स्पष्टीकरण राहुल कुल यांनी दिलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर या दोघांमध्ये याबद्दल अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे बैठकीनंतर त्यांच्याकडून जसे निर्देश मिळतील त्यानुसार आपण निर्णय घेऊ, असं दौंडचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केलं. आपल्याला रासपकडून हकालपट्टी किंवा निलंबनाबाबत अधिकृतपणे पत्र मिळालेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला दौंड आणि जिंतूर या दोनच जागा देण्यात आल्या. या दोन्ही जागेवरील उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्म दिल्याने दुग्धव्यवसाय मंत्री आणि रासपचे संस्थापक महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त करत राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांची हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं होतं.

जानकरांनीही शब्द फिरवला

आपण त्यांच्यासोबत काम करताना सर्व गोष्टी समजून घेण्याचाच प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला मंत्रिपद किंवा नंतरच्या काळात महामंडळ देण्याचा शब्द दिला होता, मात्र तो पूर्ण झाला नाही. मात्र तरीही त्यावर काही न बोलता सामंजस्याची भूमिका घेतली (Rahul Kul on Mahadev Jankar). प्रत्यक्षात महायुतीत सर्वच घटक समाधानी राहतील असं नाही. कुठे समाधान तर कुठे असमाधान असतंच, असंही राहुल कुल म्हणाले.

भाजपने 100 टक्के फसवलं, पण मी 287 जागी मदत करेन, मला गंगाखेडला सहकार्य करा : जानकर

भाजपने आम्हाला शंभर टक्के फसवलं असलं तरी शिवसेना-भाजप महायुतीतून ‘रासप’ बाहेर पडलेली नाही. शिवसेना-भाजपला 287 जागांवर मदत करणार आहोत, परंतु गंगाखेडची एक जागा आम्हाला लढवू द्या, असं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत, कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले. या दोन्ही उमेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असं जानकरांनी जाहीर केलं होतं.

रत्नाकर गुट्टे एकमेव उमेदवार

गंगाखेडला रत्नाकर गुट्टे हे आता आमचे एकमेव अधिकृत उमेदवार आहेत. गंगाखेडची जागा महायुतीत शिवसेनेला सोडली आहे. मात्र तिथे आमचा उमेदवार लढणार आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथून सेनेच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगावं. अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल, असंही जानकर म्हणाले होते.