‘दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही, ते देशाचा काय विकास करणार?’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःच्या दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही, ते देशाचा काय विकास करणार? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते रायगड येथील आपल्या जाहीर सभेत बोलत होते. मोदी-शाह यांना भारतीय राजकारणातून हद्दपार करण्यासाठी आपण हा प्रचार करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. राज ठाकरे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र […]

‘दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही, ते देशाचा काय विकास करणार?’
Follow us on

रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःच्या दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही, ते देशाचा काय विकास करणार? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते रायगड येथील आपल्या जाहीर सभेत बोलत होते. मोदी-शाह यांना भारतीय राजकारणातून हद्दपार करण्यासाठी आपण हा प्रचार करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज ठाकरे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतले होते, त्या गावात काहीच घडले नाही. गावात एकही सुविधा आली नाही. तेथील नालेही साफ होऊ शकले नाही. तेथे महाविद्यालय किंवा दवाखान्याचीह सोय नाही. स्वतः दत्तक घेतलेले गाव नीट करू शकला नाही, तर तुम्ही देशाचा काय विकास करणार?’

‘अटलजींनी मोदींसारखा युद्धाचा बाजार मांडला नाही’

नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखे काहीच उरले नाही, त्यामुळेच ते आता पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच इम्रान खान यांच्या पंतप्रधान कोण असावा याविषयीच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, पाकिस्तनचा पंतप्रधान भारताचा पंतप्रधान कोण असावा यावर बोलत आहे. इम्रान खान यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावे असं वाटतं?’ आजपर्यंत हे असे कधीही झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अटलजींच्या वेळीही कारगिल युद्ध झाले, मात्र, त्यांनी मोदींसारखा त्याचा कधीही बाजार मांडला नाही, अशीही कोपरखळी राज यांनी लगावली.

‘नोटबंदी फसली, आता मोदींनी चौक सांगावा’

नरेंद्र मोदींना नोटबंदीतून काळा पैसा बाहेर काढायचा होता, तर मग भाजपकडे निवडणुका लढवायला वारेमाप काळा पैसा कुठून आला असाही सवाल राज ठाकरे यांनी विचारला. ते म्हणाले, ‘नोटबंदीआधी बाजारात जेवढ्या नोटा होत्या त्याच्याहून जास्त नोटा आता बाहेर आहेत. नोटबंदी करताना मोदी म्हणाले होते, नोटबंदी फसली तर मला भर चौकात शिक्षा द्या. आता मोदींनी कुठला चौक निवडायचा हे सांगावे.’

‘ही निवडणूक ठरवणार देशात लोकशाही टिकणार की हुकूमशाही येणार?’

राज ठाकरे यांनी मोदींची हिटलरशी तुलना केली. ते म्हणाले, ‘1930 ला हिटलरने जर्मनीत जे जे करायचा प्रयत्न केला, तोच सगळा प्रकार नरेंद्र मोदी 2014 पासून करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते विसरले, की त्यांना आरसा दाखवायला आता सोशल मीडिया आहे’ यावेळी त्यांनी हीच निवडणूक देशात लोकशाही टिकणार की हुकूमशाही येणार हे ठरवणार असल्याचे सांगितले. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना राजकीय क्षितिजावरुन हटवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.