10 मिनिटांच्या चर्चेत मोठ्या घडामोडी, राज ठाकरे पुन्हा शरद पवारांना भेटणार!

| Updated on: Nov 03, 2019 | 10:58 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Raj Thackeray meet Sharad Pawar) यांची भेट घेतली.

10 मिनिटांच्या चर्चेत मोठ्या घडामोडी, राज ठाकरे पुन्हा शरद पवारांना भेटणार!
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Raj Thackeray meet Sharad Pawar) यांची भेट घेतली. दोघांमध्ये (Raj Thackeray meet Sharad Pawar) केवळ दहा ते 15 मिनिटे चर्चा झाली. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या 10 दिवसांत पुन्हा भेट होणार आहे.

दोन्ही नेते भले काल केवळ 10 मिनिटे एकमेकांना भेटले असले तरी येत्या 10 दिवसांत पुन्हा भेटण्याचं त्यांनी कालच्या भेटीत ठरवलं आहे. काल संध्याकाळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत पुढच्या काळात मनसेला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत घेण्याबाबत ठोस निर्णय होणं आवश्यक आहे असं मत पवारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र असणं आवश्यक आहे, असं पवार आणि राज ठाकरे यांना वाटतेय. त्यामुळे पुढील निवडणुकांच्या  व्यूहरचनेच्या दृष्टीने मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीसह पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.

काँग्रेसने अनुकलता न दर्शवल्याने विधानसभा निवडणुकीत मनसेचा आघाडीत समावेश होऊ शकला नव्हता. पण आता मनसेला आघाडीत घेण्यासाठी पवार काँग्रेस हायकमांडशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरेंनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. काही मतदारसंघात मनसे आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले नव्हते. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या विजयाला मनसेच्या मदतीचा हातभार लागला. तर मुंबईत 10 मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. याशिवाय कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतही मनसेची कामगिरी चांगली राहिली.

काही मतदारसंघात विरोधी पक्षांना आशादायी चित्र असताना युतीच्या उमेद्वारांसमोर काँग्रेस आणि मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मतविभाजनाचा फटका बसल्याचा निष्कर्ष आहे.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता, राज ठाकरे आणि शरद पवार पुन्हा भेटणार असून, येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.