मनसेच्या एकमेव आमदाराची भूमिका राज ठाकरेंच्याविरोधात? बघा काय म्हणतात राजू पाटील?

| Updated on: Jun 24, 2021 | 4:44 PM

भूमिपूत्र म्हणून आमची मुख्य मागणी आहे की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. काही राजकारणी घोळ घालत आहेत पण आम्ही ठाम आहोत, असं राजू पाटील यांनी म्हटलंय.

मनसेच्या एकमेव आमदाराची भूमिका राज ठाकरेंच्याविरोधात? बघा काय म्हणतात राजू पाटील?
आमदार राजू पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता अधिक पेटण्याची शक्यता आहे. शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर ठाम आहे. तर स्थानिक प्रकल्पग्रस्त दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आक्रमक बनले आहेत. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा दि. बा. पाटील नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या विमानतळाला देण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र आता मनसेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव दिलं पाहिजे अशी मागणी राजू पाटील यांनी केलीय. (Raju Patil’s role against Raj Thackeray over naming of Navi Mumbai Airport)

भूमिपूत्र म्हणून आमची मुख्य मागणी आहे की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. काही राजकारणी घोळ घालत आहेत पण आम्ही ठाम आहोत, असं राजू पाटील यांनी म्हटलंय. विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज सिडकोला घेराव घालण्यासाठी एकत्र आले आहे. त्यावेळी आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव दिलंच पाहिजे, ही स्थानिक भूमिपुत्र म्हणून आमची मुख्य मागणी आहे. पण त्यात काही राजकारणी घोळ घालत आहे. पण आम्ही मात्र यावर ठाम आहोत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पण सरकार घाबरलं की पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवते, असे राजू पाटील म्हणाले.

राज ठाकरेंची भूमिका काय?

“प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची त्यांची मागणी आहे. सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचं नाव देण्याची.. त्याच्यातून हा संघर्ष सुरु आहे. मोर्चे, धरणं सुरु आहे. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते. मी वस्तूस्थिती समोर ठेवली. कोणतंही विमानतळ येतं, ते शहराबाहेर येतं. तेव्हाची मुंबई पकडली, ते विमानतळ सांताक्रूझला गेलं. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं.” असे राज ठाकरे म्हणाले.

“मागे जेव्हा असं विमानतळ बनवायचं ठरलं, जीव्हेकेंना मी विचारलं हे कसलं विमानतळ आहे. त्यांनी माहिती दिली होती, आताचं विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होत आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार,” अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, त्यांना स्थानिकांबद्दल अजिबात आस्था नाही : भाजप

‘आता आमचा निर्धार ठाम, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव’, तांडेल मैदानात गर्दी जमायला सुरुवात, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Raju Patil’s role against Raj Thackeray over naming of Navi Mumbai Airport