“शेतकरी आत्महत्येला ‘पठाणी टोळी’ जबाबदार!, सरकार प्रायश्चित्त घेणार का?”, सामनातून सवाल

| Updated on: Nov 30, 2022 | 7:51 AM

शेतकरी आत्महत्येवर भाष्य करत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सरकारला प्रश्न विचारण्यात आलाय.

शेतकरी आत्महत्येला पठाणी टोळी जबाबदार!, सरकार प्रायश्चित्त घेणार का?, सामनातून सवाल
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : महावितरण (Maharashtra State Electricity Distribution Company) आणि वीजबिलावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात शेतकरी आत्महत्येवर भाष्य करत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सरकारला प्रश्न विचारण्यात आलाय. “खरीपाचे पीक महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्याने मोठय़ा उमेदीने रब्बीचा हंगाम फुलविला आहे. मात्र महावितरण नावाची ‘टोळधाड’ रब्बीचे पीकही उद्ध्वस्त करीत आहे. सरकार म्हणते, ‘फुकाच्या गप्पा मारीत नाही. वीज बिल थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही.’ महावितरण म्हणते, ‘वीज बिल भरा, नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू.’ मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलंय.

या कारभाराच्या कचाटय़ात सापडलेल्या बळीराजाने जगायचे कसे? नगर जिल्हय़ातील पोपट जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का, हाच प्रश्न आहे”, असं म्हणत सामनातून सरकारला सवाल विचारण्यात आलाय.

नगर जिल्हय़ातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. वीज बिलाच्या थकबाकीचे कारण देत महावितरणने पोपट जाधव यांचे वीज कनेक्शन तोडले होते. वीज नसल्याने शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकाचे नुकसान ते पाहू शकले नाहीत. अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि स्वतःला संपवून घेतले. शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत, असा प्रश्न सामनातून सरकारला विचारण्यात आलाय.