तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल, कांजूर मेट्रो कारशेडवरुन ‘सामना’तून इशारा

| Updated on: Dec 16, 2020 | 7:21 AM

बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजुरची मेट्रो कारशेड पुढे जाईल, असा इशारा 'सामना'तून देण्यात आला आहे.

तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल, कांजूर मेट्रो कारशेडवरुन सामनातून इशारा
Follow us on

मुंबई : मेट्रो रेल्वे प्रकल्पात कुणी मिठाचा खडा टाकणार असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार कराण्याची वेळ आली आहे. केंद्राचे कुणी उपटसुंभ बाप अचानक उपटले आणि कांजूरच्या जमिनीचा मालक असल्याचे बोलू लागले, तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल. बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजूरमार्गची मेट्रो कारशेड पुढे जाईल, राजकीय मिठाचा सत्याग्रह ही कारशेड रोखू शकणार नाही, असा इशारा ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. (Saamana Editorial on Kanjurmarg Mumbai Metro Car shed)

कांजुरमार्गला मेट्रो कारशेड झाल्यामुळे केंद्र सरकारवर आकाश कोसळणार नाही. मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर आहेत. त्यामुळे कदाचित मीठ आयुक्तांना महाराष्ट्राचे मीठ अळणी लागत असेल. आरेचे जंगल ठाकरे सरकारने वाचवले, याचे कौतुक राहिले बाजूला. कांजुरची कारशेड रोखण्याचे उपद्व्याप सुरु झाले आहेत. कोणी कितीही उपद्व्याप करा. बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजुरची मेट्रो कारशेड पुढे जाईल, राजकीय मिठाचा सत्याग्रह कारशेड रोखू शकणार नाही, असं खुलं आव्हान ‘सामना’तून देण्यात आला आहे.

“केंद्र सरकार पाकिस्तान किंवा बांग्लादेशचं नाही ना?”

मुंबईच्या विकासात खोडा घालण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. मुंबई कारशेड आरेच्या जंगलातून कांजूरमार्गच्या ओसाड जागेवर हलवली. पण ही जागा राज्य सरकारची नाही, तर केंद्राची असल्याचा वाद भाजपच्या पुढाऱ्यांनी सुरु केला. केंद्र सरकार पाकिस्तान किंवा बांग्लादेशचं नाही ना? ते आपलेच आहे. चांगल्या कामात केंद्र सरकारचे मांजर का आडवे जाते? असा सवाल ‘सामना’तून विचारण्यात आला आहे.

“तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल”

मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला कांजूरची जमीन हस्तांतर करण्याचा दिलेला आदेश मागे घ्यावा, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. यातून एका महत्त्वाच्या प्रकल्पाचा खोळंबा होतो, प्रकल्पाचा आर्थिक बोजा वाढतो, हा बोजा लोकांच्याच डोक्यावर बसतो. आरेचे जंगल कोणाच्या मालकीचे नाही, तसे कांजूरमार्गच्या जमिनीला बाप नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेची संपत्ती आहे. केंद्राचे कुणी उपटसुंभ बाप अचानक उपटले आणि जमिनीचा मालक असल्याचे बोलू लागले, तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरुन राज्य सरकार अडचणीत; न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांना तंबी

मेट्रो कारशेडचा निर्णय अहंकारातून घेतल्यानेच प्रकल्प रेंगाळला; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

(Saamana Editorial on Kanjurmarg Mumbai Metro Car shed)