मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पुण्याचे महापौर निशाण्यावर, राष्ट्रवादीबद्दल सामना मवाळ?

| Updated on: Jun 25, 2021 | 10:56 AM

आजच्या सामना अग्रलेखातून भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचे नेते, त्यांच्यावरचे आरोप याबाबत मात्र अग्रलेखात स्पष्ट असं काही लिहिलं गेलेलं नाही.

मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पुण्याचे महापौर निशाण्यावर, राष्ट्रवादीबद्दल सामना मवाळ?
संजय राऊत आणि मुरलीधर मोहोळ
Follow us on

पुणे : पुण्यात काल आंबिल ओढा अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात जो गोंधळ झाला त्यावर आजचा सामनाचा अग्रलेख आहे. यात पुण्याचं नेतृत्व करणाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आलेत. विशेष म्हणजे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडकून टिका करण्यात आली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचे नेते, त्यांच्यावरचे आरोप याबाबत मात्र अग्रलेखात स्पष्ट असं काही लिहिलं गेलेलं नाही. (Saamana Editorial Slam Pune Mayor Murlidhar Mohol but no criticism on NCP over Ambil Odha Action)

मुंगी चिरडली तरी…

पुण्यात आंबिल ओढा अतिक्रमण हटाव मोहिम राबवली गेली. पावसाळा, त्यात झोपडपट्टीधारकांचे होणारे हाल याचा कसलाही विचार न करता बिल्डरच्या हितासाठी ही कारवाई केला गेल्याचा आरोप आहे. या कारवाईसाठी पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टिका होतेय. सामनाच्या अग्रलेखातून तर अक्षरश: वाभाडे काढलेत. अग्रलेखात लिहिलंय- पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिट तिच्या मयताला पोहोचतात, पण आंबिल ओढा गरीबांच्या अश्रूंनी वाहत असतानाही सगळेजण थंड बसले आहेत.

बिल्डर जे कोणी आहेत…

कालच्या आंबिल ओढ्याच्या कारवाईबाबत भाजपच्या महापौरांवर जेवढी टिका झाली त्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर झालीय. बिल्डर केदार असोसिएट यांचे राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा आरोप पीडितांनी केलाय. त्यावर मात्र सामनाच्या अग्रलेखात थेट असं लिहिलेलं नाही. अग्रलेखात म्हटलंय, बिल्डर जे कोणी आहेत ते आहेत. पण त्यांच्या सोयीसाठी ही निर्घृण कारवाई करण्यात आली आहे. एवढं एक वाक्य सोडलं तर बिल्डरबाबत काहीही नाही जे खरं तर पीडितांच्या निशाण्यावर आहेत.

महापौर नेमकं काय म्हणाले?

कारवाईबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ अपलोड केलाय, त्यात ते म्हणतात, राजकीय आरोप झाले, एसआरएचा प्रोजेक्ट आहे म्हणून पालिकेनं कारवाई केली पण आमचा काही संबंध नाही. पालिकेनं आज जी कारवाई केली ती घाईत केली, चुकीची केली पण आपणाला हे करायचं होतं. तिथल्या नागरिकांना स्थलांतर नक्की करायचं होतं पण कसं करायचं होतं. तर त्यात ह्या लोकांना वेळ देऊन तिथून ह्या लोकांना हलवायचं होतं. जेणे करुन भविष्यामध्ये यांनाच धोका होणार नाही. पुढं ते असही म्हणतात की, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना बेताल वक्तव्य करण्याची, प्रसिद्धी मिळवण्याची सवयच आहे. मी त्यांना एवढच सांगू इच्छितो, सत्य परिस्थिती काय आहे हे पुणेकरांना माहित आहे. कुणाच्या दबावाखाली येऊन हे काम केलं, त्या व्यावसायिकाचे कुणाशी संबंध आहेत ते सगळ्या पुण्याला माहिती आहेत. एवढच नाही तर ह्या कारवाईबाबत त्यांचं ऐकलं जात नव्हतं असा दावाही महापौरांनी केलाय.

(Saamana Editorial Slam Pune Mayor Murlidhar Mohol but no criticism on NCP over Ambil Odha Action)

हे ही वाचा :

“पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, गरीबांच्या घरांवर बुलडोझर; संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार”