“राज्यात कोविडचा कहर, मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करणारा विरोधी पक्ष काय उपाययोजना देणार?”

| Updated on: Apr 04, 2021 | 8:08 AM

विरोधी पक्षाने पुढे येऊन सांगायला हवे होते. त्यात सगळय़ांचेच हित झाले असते, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. (Shivsena On Maharashtra Corona)

राज्यात कोविडचा कहर, मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करणारा विरोधी पक्ष काय उपाययोजना देणार?
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : कोरोनामुळे देशाची गती मंदावली आहे, पण राजकारणातले वारे जोरात सुरू आहेत. महाभारताचे युद्ध 18 दिवसांचे. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना पराभूत झाला नाही, पण ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी राजकीय युद्ध सुरूच आहे. हे तर नवेच महाभारत सुरू झाले! असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात याबाबत टीका करण्यात आली आहे. (Saamana Shivsena Rokthok On Maharashtra Corona Increase)

रोखठोकमध्ये काय म्हटलंय?

कोरोनामुळे देशाची गती मंदावली आहे, पण राजकारणातले वारे जोरात सुरू आहेत. महाभारताचे युद्ध 18 दिवसांचे. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान म्हणाले. कोरोना पराभूत झाला नाही, पण ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी राजकीय युद्ध सुरूच आहे. आता भीती कोरोनाची नसून लॉकडाऊनची आहे, असे शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘टाळेबंदी’ नको हे मान्य, पण ‘कोरोना’ला कसे थोपवायचे?

संपूर्ण देशात पुन्हा एकदा आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता भीती ‘कोरोना’ या विषाणूची नसून ‘लॉक डाऊन’ या सैतानाची आहे. काही झाले तरी पुन्हा ‘लॉक डाऊन’ नको अशी लोकांची मानसिकता स्पष्ट दिसत आहे. या सगळय़ाचा संबंध शेवटी नोकरी, रोजगार व आर्थिक उलाढालीशी येतो. लॉक डाऊनचा मार्ग पुन्हा स्वीकारला तर आताच उभा राहू लागलेला उद्योग-व्यापार पुन्हा कोसळून पडेल. कोरोना कुणालाच सोडत नाही. तो भेदभाव करत नाही. तो जात, धर्माची अस्पृश्यता पाळत नाही.

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना एकदा सोडून दोनदा कोरोना झाला. आदित्य ठाकरे हे कोरोनाने संक्रमित झाले. सौ. रश्मी ठाकरे यांना कोरोनामुळे इस्पितळात दाखल व्हावे लागले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाने ग्रासले. महाराष्ट्रात साधारण पंचवीस हजार लोक रोज कोरोनाग्रस्त होत आहेत. मुंबईत हा आकडा पाच हजारांवर आहे. लोकांना ‘टाळेबंदी’ नको हे मान्य, पण ‘कोरोना’ला कसे थोपवायचे? स्वतःवर निर्बंध घालून शिस्त पाळायला कोणीच तयार नाही, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार?

मुंबईसारख्या शहरातले कोविड सेंटर्स आज पूर्ण भरले आहेत. नव्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे. श्रीमंतांच्या खासगी रुग्णालयांतही जागा नाही. असे अभूतपूर्व संकट आज महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात कोविडचा कहर आहे, पण महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्दैव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगत होते, ‘हात धुवा, मास्क लावा, अंतर पाळा.’ तेव्हा त्यांच्यावर टीका करणारा विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार? असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.

विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी आणि राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही. राज्याच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते योग्य आहे, असे विरोधी पक्षाने पुढे येऊन सांगायला हवे होते. त्यात सगळय़ांचेच हित झाले असते, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

महाराष्ट्रात या काळात काय घडले?

1) लॉक डाऊन शिथिल होताच लोक बिनधास्तपणे बाहेर पडले.
2) संभाजीनगरात पुन्हा लॉक डाऊन करावे अशी स्थिती निर्माण झाली. त्यास राजकीय लोकांनी विरोध केला, पण लॉक डाऊन करण्याचा निर्णय रद्द होताच खासदार इम्तियाज जलील यांनी हजारो समर्थकांसह रस्त्यावर उतरून जल्लोष केला. हा सामाजिक अपराध आहे. ‘हल्ला मोहोल्ला’ कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली म्हणून नांदेडच्या गुरुद्वारातून शेकडो शीख तरुण तलवारी घेऊन बाहेर पडले. त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला.
3) आज लोकल ट्रेन्स खचाखच भरल्या आहेत व लोक ‘मास्क’चा नियम पाळताना दिसत नाहीत.
4) सिनेमा-थिएटर्स बंद आहेत. नाटकांवरही बंधने आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील लाखो लोकांचा रोजगार बंद आहे.
5) मॉल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध आहेत. त्यामुळे हा उद्योग गलितगात्र होऊन शेवटच्या घटका मोजत आहे. लाखो लोक या सेवा उद्योगावर जगत होते, ते मरणपंथालाच लागले.
6) मुंबई-पुण्यात आयपीएल सामने झाले ते प्रेक्षकांविना. त्यावरही मोठा रोजगार उपलब्ध होतो, जो ठप्प झाला.
7) शाळा बंद आहेत. शाळेत जाणे हे एक स्वप्न असायचे. मात्र कोरोनामुळे शाळा आणि अभ्यास घरच्या घरीच झाला. त्यामुळे एक उगवती पिढी शाळेचा आनंद घेण्यास मुकली आहे.
8) पर्यटन बंद पडले आहे.
9) साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रास ‘बांध’ पडला आहे. नाशिकला होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनही पार पडले नाही.
10) 140 कोटी लोकसंख्येचा हा देश. गर्दी हेच या देशाचे वैशिष्टय़. गर्दी हाच जगाचा बाजार. त्या बाजारात कोटय़वधी कुटुंबे जगत आहेत. तो गर्दीचा बाजारच ‘कोरोना’ विषाणूने मारला. हे असेच सुरू राहिले तर वेगळय़ाच संकटांना सामोरे जावे लागेल.

महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली तरी राजकारणाचा वेग जोरात

महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. प. बंगालात विधानसभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही. मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. ‘लॉकडाऊन’चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे कोरोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही, असेही रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

पण त्यामुळे कोरोना गेला नाही

कोरोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉक डाऊन काळात लोकांना थाळय़ा व टाळय़ा पिटायला लावले. पण त्यामुळे कोरोना गेला नाही. कोरोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळय़ा पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉक डाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नाही.

पहिल्या लॉक डाऊनला वर्ष झाले. 24 मार्च 2020 च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी अचानक संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला. त्यानंतर जे घडत गेले ते धक्कादायक आणि अमानुष होते. ‘भारत को बचाने के लिए, भारत के हर नागरिक को बचाने के लिए, आप सभी को बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पुरी तरह से पाबंदी है!’ ही घोषणा मोदींनी करताच संपूर्ण देशात हाहाकार माजला. स्वातंत्र्यानंतरचे सगळय़ात मोठे पलायन भारताने याच काळात पाहिले. देशभरात लोक अडकून पडले. ऑटो, सायकल, बाईकने, पायी चालत असा प्रवास लोकांनी दोन-दोन हजार किलोमीटर केला. त्या प्रवासात अनेकांनी प्राण सोडले, असेही शिवसेनेने टीका केली आहे.

कोरोना हरणार नाही, पण ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी सरकारने शक्तीपणाला लावली

पुढचे सहा-सात महिने लोकांनी घरातच काढले. कमाईचे साधन बुडाले. रोजगार संपला, पण भीतीने त्या सगळय़ांना घरात कोंडून ठेवले. त्या भीतीची भिंत आता फुटली आहे. ती बांधता येणे कठीण आहे. महाभारताची लढाई 18 दिवस चालली. तुम्ही मला 21 दिवस द्या. 21 दिवसांत कोरोनाला हरवू, असे पंतप्रधान म्हणाले होते. आज एक वर्षानंतरही कोरोनाची लढाई व लॉक डाऊनची भीती कायम आहे. कोरोना हरणार नाही. ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी सरकारने शक्ती पणाला लावली, अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.  (Saamana Shivsena Rokthok On Maharashtra Corona Increase)

संबंधित बातम्या : 

कोरोनाचा विस्फोट! राज्यात दिवसभरात 49 हजार 447 कोरोनाबाधित सापडले

लॉकडाऊन करू नका, सदाभाऊ खोतांचं थेट राज्यपालांनाच साकडं, ‘या’ 10 प्रमुख मागण्या