Mumbai : शिवसेनेचं मुंबईत ‘मिशन 150’, किशोरी पेडणेकरांनी केला बाप्पाच्या साक्षीने दावा..!

गेल्या 25 वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, हेच मोडीत काढण्यासाठी आता भाजपाकडून सर्वतोपरी तयारी केली जात आहे. आगामी दोन दिवस गृहमंत्री अमित शाह देखील मुंबईत दाखल होत आहेत. असे असले तरी महापालिकेवर भगवाच कायम राहणार असा दावा केला जात आहे.

Mumbai :  शिवसेनेचं मुंबईत मिशन 150, किशोरी पेडणेकरांनी केला बाप्पाच्या साक्षीने दावा..!
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर
| Updated on: Sep 03, 2022 | 5:37 PM

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकारणाला (Mumbai Municipal Election) मुंबई महापालिका निवडणूकांची किनार ही आहेच. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्वकाही सुरु आहे. एकीकडे मुंबई महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी (BJP Party) भाजपाकडून सर्वतोपरी तयारी केली जात असतनाच दुसरीकडे या निवडणुकीत (Shiv Sena) शिवसेना 150 जागांवर निवडूण येणार असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय परस्थितीचा परिणाम मुंबई महापालिका निवडणूकांवर होणार की, शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार हे देखील पहावे लागणार आहे.

महापालिकेसाठी शिवसेनेचा 150 चा नारा

गेल्या 25 वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, हेच मोडीत काढण्यासाठी आता भाजपाकडून सर्वतोपरी तयारी केली जात आहे. आगामी दोन दिवस गृहमंत्री अमित शाह देखील मुंबईत दाखल होत आहेत. असे असले तरी महापालिकेवर भगवाच कायम राहणार असा दावा केला जात आहे. किशोरी पेडणेकर यांनी तर यंदाच्या निवडणुकांमध्ये सेनेच्या जागांमध्ये वाढ होऊन हा आकडा 150 असेल असे सांगितले आहे.

भाजपाची रणनिती काय?

राज्यातील राजकीय भूकंपाचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपाचा राहणार आहे. त्यामुळेच आतापासून निवडणुकीची रणनिती कशी राहणार याबाबत पदाधिकारी मेळावे, नियुक्त्या आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. शिवाय आगामी दोन दिवस गृहमंत्री अमित शाह हे मुंबईतच असणार आहेत. या दरम्यान, मुंबई महारपालिका निवडणूकीच्या अनुशंगाने काय धोरण ठरते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनसेला विचारधारा राहिली नाही

मनसेच्या भूमिकेबाबत किशोरी पेडणेकर यांनी पक्ष नेतृत्वावरुन सडकून टीका केली आहे. राज ठाकरे हे उद्या कोणाच्याही व्यासपीठावर दिसतील. याबाबत नवखे असे काही राहणार नाही. ते फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत त्या व्यासपीठावर येणार नाहीत असेही पेडणेकर ह्या म्हणाल्या आहेत. यामुळे पक्षाला कोणती विचारधाराच राहिलेली नाही हेच स्पष्ट होते असा आरोपही त्यांनी केला आहे.

बाप्पाच्या साक्षीनेच पेडणेकरांचा दावा

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर ह्या TV9 मराठी कार्यालयातील बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी बाप्पाच्या साक्षीने मुंबई महापालिकेवर सेनेचे 150 नगरसेवक असणार हा दावा केला. तर मनसेची बदलती भूमिका ही कशामुळे जनतेला माहित असल्याचेही त्या म्हणाल्या. नेत्यांमध्ये बदल होतील पण शिवसैनिकांमध्ये नाही असे म्हणत त्यांनी मुंबई महापालिका शिवसेनेचीच असे ठासून सांगितले आहे.