“2014 नंतरचे नवे स्वातंत्र्य! स्वातंत्र्या तुझी खरी व्याख्या काय?”, स्वातंत्र्यदिनापूर्वी सामानातून ‘रोखठोक’ सवाल

| Updated on: Aug 14, 2022 | 7:22 AM

Azadi Ka Amtrut Mahotsav : 2014 नंतर जे स्वातंत्र्य मिळाले ते हेच आहे. तरीही हे स्वातंत्र्या, तुझी व्याख्या सांग ! आझादीच्या मृत महोत्सवात तरी तू बोल, तुझी व्याख्या सांग!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

2014 नंतरचे नवे स्वातंत्र्य! स्वातंत्र्या तुझी खरी व्याख्या काय?, स्वातंत्र्यदिनापूर्वी सामानातून रोखठोक सवाल
Follow us on

मुंबई : देश स्वतंत्र्य (Independence Day) होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात यंदा ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) साजरा केला जात आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते 2014 नंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं ,असं वारंवार म्हणतात. त्यावर सामनाच्या रोखठोक सदरातून (Saamana Editorial) टीका करण्यात आली आहे. “उद्याचा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. पंतप्रधान मोदी यांनी उत्सव साजरा करा, असे सांगितले. घराघरांत तिरंगे वाटले गेले, पण कोणत्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव? काँग्रेसचे स्वातंत्र्यलढय़ातले योगदान विसरता येत नाही आणि देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे ठामपणे सांगणारे लोक देशाच्या सत्तेवर आहेत”, असं म्हणत सामनातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनसुब्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आलं आहे.

व्यर्थ न हो बलिदान

आपले परमपूज्य पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ जगभरात साजरा करायचे ठरवले व त्यानुसार आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला आहे. यानिमित्ताने घराघरांत तिरंगा वाटण्याचा उपक्रम आहे व काही कोटी तिरंग्याचे वाटप करण्यात आले. कॉंग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व केले. गांधी, नेहरू, पटेल, मौलाना आझाद यांच्यासह सावरकर, भगतसिंग, अश्फाक उल्ला खाँ, राजगुरू यांच्यासह असंख्य क्रांतिकारकांचे योगदान स्वातंत्र्यलढय़ात आहे. टिळकांपासून नेहरूंपर्यंत काँग्रेसच्या पुढाऱयांनी सर्वाधिक संघर्ष केला. तुरुंगवास भोगला, पण काँग्रेसला पूर्णपणे बाजूला ठेवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. औपचारिकता म्हणून उद्या 15 ऑगस्टला गांधीजींचे नाव फार तर घेतले जाईल, पण स्वातंत्र्यलढय़ाशी कॉंग्रेस व त्यांच्या नेत्यांचा काडीमात्र संबंध नाही हे बिंबविण्याचे हरतऱहेचे प्रयत्न गेल्या 7-8 वर्षांत सुरू आहेत. मोदी यांचे राज्य देशावर 2014 साली आले. भारतीय जनता पक्षाचे काही उतावीळ लोक म्हणतात, देशाला खरे स्वातंत्र्य 2014 सालीच मिळाले.’ असे बोलणे किंवा विचार करणे हा त्या देदीप्यमान स्वातंत्र्य समराचा अपमान आहे. मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीच्या राणीपासून सुरू झालेला हा संग्राम, त्यात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी अशा सगळ्यांनीच योगदान दिले; पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपला देश, लोकशाही व स्वातंत्र्य नक्की कोठे आहे ते तपासून घेण्याची वेळ आली आहे.

घाण साफ झाली काय?

स्वातंत्र्यासमोर आज आव्हानात्मक परिस्थिती आहे. देशातली घाण साफ करण्यासाठी मोदी आले, पण उपयोग झाला नाही. काही उद्योगपती, व्यापाऱयांना अटक झाली, पण जे खरेच तुरुंगात असायला हवेत ते सर्व भाजपचे देणगीदार व सरकारचे आश्रयदाते बनलेले आहेत. देशाची निरंकुश सत्ता मोदी-शहांच्या हातात आज आहे, पण स्वातंत्र्याची पहाट काळय़ाकुट्ट ढगांनी झाकली आहे. सार्वभौम लोकशाहीचा देव्हारा रिकामा आहे. न्यायालयांपासून वृत्तपत्रांपर्यंत सगळेच भीतीच्या सावटाखाली आहेत. निवडणुका होत आहेत, पण लागलेल्या निकालांवर लोकांचा विश्वास नाही. तिरंगा फडकतोय, पण संविधान पायदळी आहे. देशात अशी भयग्रस्त, अराजकसम स्थिती यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती. तरीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्य व लोकशाही श्वास घेण्यासाठी धडपडत आहे!

हे सुद्धा वाचा

हे कसले स्वातंत्र्य? 2014 नंतर जे स्वातंत्र्य मिळाले ते हेच आहे. तरीही हे स्वातंत्र्या, तुझी व्याख्या सांग ! आझादीच्या मृत महोत्सवात तरी तू बोल, तुझी व्याख्या सांग !