Sambhaji Brigade : का, ओ फडणवीस दंगली घडवायच्यात का? संभाजी ब्रिगेडचा सवाल

Sambhaji Brigade : आता संभाजी ब्रिगेडने देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमक भाषणावर आक्षेप घेतलाय. 'माझ्या आदेशाची वाट पाहू नका? डायरेक्ट ठोकून काढा?' असं फडणवीस म्हणालेत. "ज्याला बॅटिंग करायचीय, त्याने मैदानात उतरुन बॅटिंग करावी. फक्त हिट विकेट होऊ नका" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sambhaji Brigade : का, ओ फडणवीस दंगली घडवायच्यात का? संभाजी ब्रिगेडचा सवाल
Devendra Fadnavis on Mahavikas Aaghadi
| Updated on: Jul 22, 2024 | 1:16 PM

पुण्यात काल भाजपाच एक दिवसीय अधिवशेन झालं. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण केलं. त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विरोधीपक्षांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला. विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात, त्याला उत्तर देण्याच आवाहन फडणवीस यांनी केलं. “आपल्याकडे आदेशाची वाट बघत बसतात. आदेश आला तर उत्तर देईन. आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायचीय, त्याने मैदानात उतरुन बॅटिंग करावी. फक्त हिट विकेट होऊ नका. फुटबॉल खेळणाऱ्यांना माहित असतं. सेल्फ गोल करायचा नाही. आदेश विचारु नका. मैदानात उतरा, ठोकून काढा” असं उपमुख्यमंत्री उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवताना म्हणाले.

आता संभाजी ब्रिगेडने देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमक भाषणावर आक्षेप घेतलाय. “माझ्या आदेशाची वाट पाहू नका? डायरेक्ट ठोकून काढा? ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा गृहमंत्री पदाला शोभणारी नाही. कदाचित राज्याच्या गृहमंत्र्याला महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे? त्यासाठी दंगली घडविल्याशिवाय पर्याय नाही किंवा वाद घातल्याशिवाय पर्याय नाही असेच या वक्तव्यावरून कळतं” असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले.

‘एकनाथ शिंदे साहेबांना हे मान्य आहे का?’

“म्हणजे जे जे सरकारवर किंवा फडणवीसांवर टीका करतात त्यांना कदाचित फोडून काढण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांची असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे मान्य आहे का?” असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी विचारला आहे. “मी, देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुसंस्कृत नेता समजत होतो. तो शब्द त्यांनी चक्क पुसून काढला. ‘ठोकून काढा’ म्हणणे म्हणजे गुंडगिरी दादागिरीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. महाराष्ट्राच काय होईल हे आता सांगता येणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध” असं संतोष शिंदे म्हणाले.