निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एक नवीन पक्ष, राज्यात राजकीय चुरस वाढणार

maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक नवीन पक्षाची एन्ट्री झाली आहे. येत्या २०२४ च्या निवडणूक रणधुमाळीत युती, आघाडी असताना हा नवीन पक्ष निवडणूक लढवणार आहे. पुण्यातून ही घोषणा करण्यात आली.

निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एक नवीन पक्ष, राज्यात राजकीय चुरस वाढणार
| Updated on: May 27, 2023 | 3:23 PM

पुणे : राज्यात आघाडी अन् युतीचे राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेना ठाकरे गट आहे. ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेडशी युती करत त्यांनाही राज्याच्या राजकारणात उतरवले आहे. दुसरीकडे भाजप अन् शिवसेना युती आहे. इतर लहान पक्षही राज्यात आपले अस्तित्व दाखवून आहे. आता आणखी एका नवीन पक्षाची एन्ट्री राज्याच्या राजकारणात होत आहे. कधीकाळी भाजपसोबत असणाऱ्या बड्या नेत्याने नवीन पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून संभाजी राजे यांनी २०२४ ची निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

काय म्हणाले संभाजी राजे

पुण्यात संभाजी राजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य भवनाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी राजे यांनी २०२४ ची निवडणूक लढवण्याची घोषणा केली. स्वराज्य संघटना कुठल्याही परिस्थितीत 2024 ला निवडणूक लढवणार आहे. तयारीला लागा, आपण निवडणुका लढवू, अशी घोषणा संभाजी राजे यांनी केली. संघटनेचा अजेंडा पुढचं नियोजन अणि ध्येय हे सगळ अधिवेशनात बोलणार असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. स्वराज्य संघटना भक्कम होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

स्वराज्य भवन उभारले

सर्व जण अडचणी घेऊन येतील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वराज्य भवन उभारले आहे. या ठिकाणी सगळ्याचा अडचणी समजून घेतल्या जातील. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय असणार आहे. स्वराज्य सामान्य लोकांचं आहे म्हणून उद्घाटन त्यांच्या हस्ते केले. यावेळी उदयन राजे यांच्या प्रश्नावर बोलणं संभाजी राजे यांनी टाळलं.

संभाजी ब्रिगेडची मागणी

संभाजी ब्रिगेडही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. संभाजी ब्रिगेडकडूनही लोकसभेच्या तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडकडून पुणे. हिंगोली आणि बुलढाण्याच्या जागांची मागणी ठाकरे गटाकडून केली आहे. दोन किंवा तीन जागांवर लोकसभा उमेदवार उभे करण्याचे संभाजी ब्रिगेडची तयारी आहे.

महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागा संभाजी ब्रिगेडला देण्याची मागणी केली गेली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यांकडे तीन जागांची मागणी केल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता महाविकास आघाडी आणि युती टिकवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी त्यांना मोठी तडजोड करावी लागणार आहे