स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी का करतात? मनसेचा खडा सवाल

स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी का करतात? मनसेचा खडा सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची युतीसंदर्भात फोनवरुन चर्चा झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी का करतात? असा रोखठोक सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

“स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी तरी का करत आहेत? हे ट्वीट खास माझ्याशी नेहमी भांडण्याऱ्या, पण माझ्यावर मनापासून प्रेम करण्याऱ्या शिवसेनेच्या मित्रांना अर्पण करत आहे.” असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या ‘रोखठोक’ सवालामुळे आता पुन्हा मनसे विरुद्ध शिवसेना असा ‘सामना’ रंगण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची फोनवरुन चर्चा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत चर्चा केली. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी ‘मोठय़ा भावा’चा आग्रह कायम ठेवत, 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव अमित शाहांपुढे ठेवला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, लोकसभेसोबतच विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे, अशीही उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांसमोर भूमिका मांडली.

1995 साली शिवसेनेने 169, तर भाजपने 116 जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या पक्षांनी 138 जागा जिंकून युतीचे पहिले सरकार राज्यात स्थापन केले होते. जागावाटपाच्या या सूत्रानुसार राज्यात युतीचे सरकार आले, तर मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचाच दावा असेल, असेही सांगितले जात आहे.

आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवू, अशी घोषणा करुन काही महिने उलटत नाहीत, तोच शिवसेनेचं ‘स्वबळ’ नरमल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेवर टीका सुरु झाली आहे.

Published On - 11:34 am, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI