रक्त सांडले तरी चालेल महाराष्ट्राची एक इंचही भूमी कर्नाटकला देणार नाही, ‘या’ नेत्याचा आक्रमक पवित्रा

| Updated on: Nov 23, 2022 | 2:39 PM

सीमावादाचा निर्णय अंतिम टप्प्यात असून लक्ष विचलित करण्यासाठी हे भाजपचे षडयंत्र असल्याची टीका  कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली आहे.

रक्त सांडले तरी चालेल महाराष्ट्राची एक इंचही भूमी कर्नाटकला देणार नाही, या नेत्याचा आक्रमक पवित्रा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिनकर थोरात, कोल्हापूरः सांगली जिल्ह्यातील (Sangli District) जत तालुक्यातील 40 गावांवर दावा ठोकण्याची तयारी कर्नाटक सरकारने (Karnataka Government) केली असल्याच्या बातमीवरून सध्या चांगलंच राजकारण तापलंय. पण रक्त सांडलं तरी चालेल, महाराष्ट्राची एक इंचही जमीन कर्नाटकला मिळू देणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सकारात्मक वातावरण असताना भाजपने षडयंत्र रचल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असा दावा केल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.

कोल्हापूरमध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी टीव्ही 9 शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ रक्त सांडले तरी चालेल महाराष्ट्राची एक इंच ही भूमी कर्नाटकला देणार नाही. सीमावादाचा निर्णय अंतिम टप्प्यात असून लक्ष विचलित करण्यासाठी हे भाजपचे षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली. शिवसैनिक महाराष्ट्र आपल्या पध्दतीने कर्नाटकला हिसका दाखवेल असा इशारा दिला आहे.

तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही माहिती न घेता राजकीय प्रतिक्रिया दिली आहे. आता काही गाव मागितली उद्या मुंबई, नागपूर मागतील मागायचा त्यांचा अधिकार आहे.. मात्र हा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लढ्यात 14 दिवस तुरुंगात काढले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया माजी पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे माध्यमाना दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांनी दुष्काळी स्थितीला कंटाळून कर्नाटक राज्यात शामिल करून घ्या, असा ठराव काही वर्षांपूर्वी केला होता. त्याचा हवाला देत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक वक्तव्य केलं. ही ४० गावं कर्नाटकात शामिल करून घेण्याबाबत आम्ही गंभीर आहोत, असं ते म्हणाले. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलले, ते समजून घ्या.. या सीमा वादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले… त्यामुळे सीमा भागातील आपल्या लोकांना मदत करण्याचे आपण ठरवले आहे .. त्यांच्यासाठी आधीच्या आणि काही नवीन योजना आपण पोहोचवत आहोत… त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असा वक्तव्य दिला असावा.

एकही गाव महाराष्ट्रातून कुठे जाणार नाही… आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह जे आमचे गाव आहेत ते आम्ही सर्व मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.