
बुलढाणा: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानाचे आज तिसऱ्या दिवशीही राज्यभरात पडसाद उमटले आहेत. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेला असतानाच आता शिंदे गटही आक्रमक झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कुणीही अनादर केला तर ते खपवून घेतलं जाणार नाही. सातत्याने अशी विधाने आली तर दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होऊ शकतं, असा इशाराच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.
या राज्यपालाला कुठं नेऊन घालायचे ते घाला. पण त्यांना आवरा. नाही तर एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट येऊ शकतं, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. शिवछत्रपतींचा इतिहास कधीही जुना होत नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने महाराजांचा एकेरी उल्लेख करत असतात. यापूर्वी सुद्धा अनेकवेळा त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल विधाने केली आहेत, याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधलं.
ज्या राज्यपालांना इतिहास माहीत नाही. त्यांना खुर्चीवर ठेवून फायदा नाही. या ठिकाणी मराठी मातीतील माणूसच हवा. त्यामुळे या राज्यपालांना कुठे नेऊन ठेवायचे ते ठेवा. पण इथे नको, ही आमची केंद्राला विनंती आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा देखील समाचार घेतला. नेहमी नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलणं बरं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल. त्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करत राज्यपालांचा निषेध नोंदवला.
यावेळी काळी टोपी जाळण्यात आली. धोतरही फेडण्यात आलं. तसेच राज्यपाल गो बॅकच्या घोषणाही देण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.