शिवसेना-भाजपात धुसफूस? बडा नेता बैठकीतून थेट बाहेर पडला…पडद्यामागे काय घडतंय?
राज्यात अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांसाठी चर्चा चालू आहे. असे असतानाच जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात जागावाटपावरून चर्चा चालू आहे.

Jalgaon Municipal Corporation Election : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळी एकूण 29 महापालिकांची निवडणूक सोबतच होणार आहे. या निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल तर 16 जानेवारी निकाल लागणार आहे. दरम्यान ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्यात युती आणि आघाड्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन ही युती केली जात आहे. मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाहेर ठेवून भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने युती केली आहे. तर सोलापुरात शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती करून भाजपाला बाहेर ठेवलं आहे. जळगावातही युतीसाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युतीसाठी चर्चा होत आहे. परंतु जागावाटपावरून अद्याप दोन्ही पक्षांत एकमत झालेले नाही. शिंदे गटाने दिलेला जागांचा प्रस्ताव भाजपाने मान्य केलेला नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीतून मंत्री गुलाबराव पाटील अवघ्या 15 मिनिटांनी बैठकीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता जळगावात घडामोडींना वेग आला आहे.
भाजपाला प्रस्ताव अमान्य
मिळालेल्या माहितीनुसार जळगावातील अजिंठा विश्रामगृहात भाजपाचे नेते तथा गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान युतीमध्ये शिवसेनेने भाजपाला एकूण 26 जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु भाजपाने या हा प्रस्ताव अमान्य केला आहे. ही बैठक फक्त पंधरा मिनिटे झाली. जागावाटपावर एकमत न झाल्याने मंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून बाहेर पडले आणि परतले.
युती होणार की नाही?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला लांब ठेवून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची गुप्त बैठक सुरू असल्याचे सांगितले जात होते. आजची बैठक मात्र राष्ट्रवादीला सोबत घेण्यासह जागांचा फॉर्मुला ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. भाजपा आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत युतीची घोषणा झालेली आहे. परंतु जागावाटपांचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळेच जळगावच्या महापालिकेत शिवसेना-भाजपची युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
