
पुणेः कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) मतदार संघातील पोट निवडणुकांचा (By Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. विधान परिषद निवडणुकांतील पराभव भाजपने अधिकच गांभीर्याने घेतला असून आता प्रत्येक निवडणुकीत सर्व उपाय आजमावले जात आहेत. याच मालिकेत काल प्रकृती अस्वास्थामुळे विश्रांती घेत असलेल्या गिरीश बापट यांना भाजपने प्रचारात उतरवले. ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घेऊन गिरीश बापट प्रचारासाठी हजर झाले. मात्र यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
आजारी नेत्यालाही प्रचारात उतरवणाऱ्या भाजपाकडे थोडीही माणुसकी शिल्लक नाही, असे आरोप केले जातायत. यावरून भाजपच्या नेत्यानेच स्पष्टीकरण दिलंय. यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलंय. भाजप नेते संजय काकडे यांनी हे वक्तव्य केलंय.
गिरीश बापट यांच्याविषयी बोलताना संजय काकडे म्हणाले, ‘ खासदार गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची एक खुजली आहे. राजकारण आलं की ते कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडतात. त्यांच्या डोक्यात राजकारण भिनलं आहे. बापट 1968 पासून प्रचारात सहभागी होत आलेले आहेत. त्यामुळे राजकारणापासून ते स्वतःला फार वेगळं ठेवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली.
संजय काकडे पुढे म्हणाले,’घोडा कितीही म्हातारा झाला तरी पळतो. सिंह कितीही म्हातारा झाला तरी घास खातो,तशीच गत गिरीश बापट यांची झाली आहे. ते इथे स्वखुशीने आलेत. बापट प्रचाराच्या रिंगणात आल्यानं एक जोश आला आहे.
कसबा पेठ निवडणुकीतील उमेदवारीवरून गिरीश बापट नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच ते निवडणूक प्रचारापासून लांब असल्याचं म्हटलं जात होतं. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण होतंच, मात्र नाराजीचीही चर्चा होती.
देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बापट यांची भेट घेतली. त्यानंतर मी नाराज नसल्याची प्रतिक्रिया गिरीश बापट यांनी दिली. फडणवीस यांनी बापट यांची मनधरणी केल्याचं म्हटलं जाऊ लागलं. त्यानंतर गिरीश बापट थेट प्रचारासाठी आले, तेही ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घेऊन.
बापट यांची मनधरणी करण्यात फडणवीस यशस्वी ठरले, असे म्हटले गेले. यावरून संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस भेटायला जाणं म्हणजे झाडावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला झालं..ते केवळ बापट यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते.