Sanjay Raut : खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज, सुत्रांची माहिती, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून बैठकीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 11, 2022 | 4:44 PM

जे 15 खासदार उपस्थित होते त्या खासदारांची ही भूमिका होती की एक आदिवासी महिला उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, मात्र त्यानंतरच संजय राऊत हे नाराज झाले आहेत.

Sanjay Raut : खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज, सुत्रांची माहिती, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून बैठकीत नेमकं काय घडलं?
खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज, सुत्रांची माहिती, बैठकीत नेमकं काय घडलं? ज्याने राऊत नाराज झाले...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदारांची आज एक मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मोठी बैठक पार पडली आहे. मात्र या बैठकीनंतर शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 15 खासदारांनी राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केल्याने संजय राऊत नाराज असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. राऊत त्यांनी या बैठकीनंतर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. संजय राऊत हे या खासदारांच्या बैठकीला उपस्थित होते. सर्व खासदारांचे मत या बैठकीत जाणून घेण्यात आलं 19 पैकी 15 खासदार या बैठकीला उपस्थित होते. जे 15 खासदार उपस्थित होते त्या खासदारांची ही भूमिका होती की एक आदिवासी महिला उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, मात्र त्यानंतरच संजय राऊत हे नाराज झाले आहेत.

निवडणुकीत शिवसेनेसमोरचा नेमका पेच काय?

भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा हा यशवंत सिन्हा यांनाच राहावा, अशी राऊतांची इच्छा होती. मात्र शिवसेना खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केल्याने राऊत नाराज झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वात आधी या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना गळ घालण्यात आली होती, पण शरद पवार यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्लीत दोन-तीन हाय व्होल्टेज बैठका पार पडल्या आणि यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली. आता त्याच निवडणुकीवरून संजय राऊत हे नाराज झाले आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी उद्धव ठाकरे कशी दूर करणार? हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आगामी काळातील चित्र बदलणार?

शिवसेना आमदारांचा बंड झाल्यापासून सर्व आमदारांच्या टार्गेटवर फक्त संजय राऊत आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच एवढं मोठं बंड झालं. संजय राऊत यांचा शरद पवारांशी जवळीक करण्याचा हट्ट शिवसेनेला नडतोय. त्यामुळे शिवसेनेचे नुकसान होतेय. असा आरोप करत शिवसेना आमदारांनी बंडाचं हत्यार उपासलं. मात्र त्या नंतर संजय राऊत यांनी आग पाखड करत बंडखोर शिवसेना आमदारांवर सडकून टीका केली आहे. मात्र दुसरीकडे आता खासदारांचा पाठिंबा ही शिंदे गटाला वाढू लागला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आगामी काळात काही वेगळा निर्णय घेणार का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे. तसेच येत्या राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांचं मतदान नेमक कोणाला होतं? हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.