Sanjay Raut | शरद पवारांची स्तुती का करतो? संजय राऊतांचं थेट उत्तर, नाशिक दौऱ्यापूर्वी सिल्वर ओकवर!

| Updated on: Jul 07, 2022 | 11:47 AM

संजय राऊत आज नाशिक शिवसेना नेत्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत तत्पुर्वी ते शरद पवार यांचे निवास स्थान सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. या भेटीत राऊत आणि पवारांमध्ये नेमकी काय चर्चा होतेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Sanjay Raut | शरद पवारांची स्तुती का करतो? संजय राऊतांचं थेट उत्तर, नाशिक दौऱ्यापूर्वी सिल्वर ओकवर!
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) हे शरद पवारांच्या जवळचे आहेत. शरद पवारांचीच (Sharad Pawar) ते स्तुती करतात, असे आरोप वारंवार केले जातात. हिंदुत्ववादी शिवसेनेचे नेते असूनही संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर एवढी स्तुती सुमनं उधळत असतात, यामागील नेमकं कारण संजय राऊतांनी सांगितलं. महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रीय पातळीवरचे ते एकच नेते आहेत, त्यामुळे शरद पवारांची स्तुती करायची नाही तर कुणाची करायची, असा सवाल राऊतांनी केला. मीच नाही तर भाजपचे अनेक नेतेही शरद पवारांचं कौतुक करतात, हेही त्यांनी सांगितलं. शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलसाठी आज संजय राऊत नाशिकला जात आहेत. नाशिक दौऱ्यापूर्वी ते शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास स्थानावर त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. महाविकास आघाडीतील प्रत्येक निर्णय घेण्यात शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर आघाडीचं पुढे काय होणार, असा प्रश्न सर्वांना पडलाय. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची मानली जातेय.

पवारांची स्तुती नाही तर कुणाची करायची?

संजय राऊत नेहमी शरद पवारांची स्तुती करतात, या आरोपांना आज राऊतांनी स्पष्टच उत्तर दिलं. ते म्हणाले, फक्त मीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्याविषय़ी बोलतात. या देशातला कोणता नेता त्यांच्याविषयी बोलत नाही? स्वतः नरेंद्र मोदी असतील. नितीन गडकरी, भाजपाचेच लोक जास्त कौतुक करतात. ते कौतुकास्पदच व्यक्तीमत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्याचंच कौतुक करायचं नाही तर कुणाचं करायचं? हे आम्हाला एकदा त्यांनी सांगावं. कारणं काहीही असतील. तुम्ही त्याच सरकारमध्ये होतात अडीच वर्ष. त्यामुळे तुम्ही असे आरोप करण्यात तथ्य नाही, असं उत्तर संजय राऊत यांनी बंडखोरांना दिलं.

सिल्वर ओकवर महत्त्वाची बैठक

संजय राऊत आज नाशिक शिवसेना नेत्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत तत्पुर्वी ते शरद पवार यांचे निवास स्थान सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. या भेटीत राऊत आणि पवारांमध्ये नेमकी काय चर्चा होतेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे खासदाराच्या भूमिकेतून या निवडणुकीत काय स्टँड घ्यायचा, याविषयी भेटीत चर्चा होऊ शकते. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं आहे. अजित पवार हे विरोधी पक्षनेते असून राज्यात पुढील रणनीती काय असेल, याविषयीदेखील या भेटीत चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.