मोठी बातमी : सत्यजित तांबे आमचेच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा, नाशिकच्या नाट्यावर पडदा पडणार?

नाशिकमध्ये विजयी झालेले सत्यजित तांबे हे आमचेच आहे. झालं गेलं महाभारत विसरून त्यांना पक्षात घ्यावं, अशी विनंती आपण हायकमांडला करणार आहोत, असं वक्तव्य काँग्रेस नेत्यानं केलंय.

मोठी बातमी : सत्यजित तांबे आमचेच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा, नाशिकच्या नाट्यावर पडदा पडणार?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 04, 2023 | 12:30 PM

मनोज गाडेकर, नाशिकः नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसला (Congress) अंधारात ठेवून निर्णय घेतला. भाजपासोबत जातात की काय असे वाटले. अखेर अपक्ष म्हणूनच विजयी झाले… नाशिकच्या निवडणूक नाट्यात महत्त्वाचे पात्र ठरलेले सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आता काँग्रेसचे की भाजपचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावरून आज तांबे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तरीही काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलेल्या वक्तव्याने नेमकं काय घडणार, याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमध्ये विजयी झालेले सत्यजित तांबे हे आमचेच आहे. झालं गेलं महाभारत विसरून त्यांना पक्षात घ्यावं, अशी विनंती आपण हायकमांडला करणार आहोत, असं वक्तव्य माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. नुकतीच त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.

विजय वडेट्टीवार यांनी आज शिर्डी येथील साई दरबारात साई समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

सत्यजित तांबे आमचेच…

विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले,
शिक्षक-पदवीधरच्या पाच पैकी चार जागा आम्ही जिंकलो. सत्यजित आमचेच असल्याचे आम्ही गृहीत धरतो. तीन जागा महाविकास आघाडीच्या आणि सत्यजित आमचेच…
जे सत्य आहे ते असत्य होऊ शकत नाही. साईबाबांनी यश दिलंय त्यामुळे त्यांच्या चरणावर डोके ठेवायला आलोय. भविष्यात असेच यश मिळत राहो यासाठी आशीर्वाद मागितल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

हायकमांडला विनंती करणार…

सत्यजित तांबेंच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह घेऊन लढले नाही. सत्यजित आमचे आहेत आणि आमच्या बरोबर राहातील असा विश्वास, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

तसेच झालं गेलं महाभारत विसरून सत्यजित तांबेंना सोबत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः हाय कमांडला तशी विनंती करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

काँग्रेसमध्ये धुसफूस, नाराजी?

नाना पटोले यांच्या भूमिकेवरून सत्यजित तांबे यांची नाराजी असल्याचं म्हटलं जातंय. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘ सत्यजित काय भूमिका मांडतात त्यातून वस्तुस्थिती पुढे येईलच.. पक्षावर राग नसेल तर त्यांनी पक्षासोबत राहावं. पण पक्षातील पद आणि व्यक्ती बदलत राहातात. त्यांची वैयक्तिक कुणावर नाराजी असेल तर पक्षाला सोडून जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. युवक काँग्रेसमध्ये सत्यजीतने माणसं जोडली असून चांगलं काम केल
असा व्यक्ती काँग्रेसमध्ये रहावा, असेही ते म्हणाले.

शिंदे गट – भाजपाच धुसफूस?

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे मंत्रिपदावरून भाजपावर नाराज असल्याचं म्हटलं जातंय. यावर वडेट्टीवार म्हणाले, ‘ प्रत्येकाला मंत्री व्हायचं असून पैसे ओढण्याची स्पर्धा लागलीये… त्यामुळे धुसफूस वाढणारच.. पदवीधर-शिक्षक मतदारसंघात मविआच्या यशामुळे हे बिथरलेत, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय.