खरंच ‘INS विराट’चा राजीव गांधींनी टॅक्सीसारखा वापर केला होता?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झाले आहे. सहाव्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होईल. दरम्यान, निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोप टोकदार आणि व्यक्तिगत होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. 1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी 10 दिवसांच्या सहलीसाठी बेटावर जाताना आयएनएस विराट या युद्धजहाजाचा टॅक्सीप्रमाणे उपयोग केल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी […]

खरंच INS विराटचा राजीव गांधींनी टॅक्सीसारखा वापर केला होता?
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झाले आहे. सहाव्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होईल. दरम्यान, निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोप टोकदार आणि व्यक्तिगत होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. 1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी 10 दिवसांच्या सहलीसाठी बेटावर जाताना आयएनएस विराट या युद्धजहाजाचा टॅक्सीप्रमाणे उपयोग केल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी आरोप करताना सहलीच्या ठिकाणाचा मात्र उल्लेख केला नाही. त्यानंतर राजीव गांधींची ही सहल नेमकी कोणत्या बेटावर झाली होती याबद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे.

राजीव गांधींची सहल बंगाराम बेटावर झाली

दक्षिण भारतात कोचीपासून पश्चिमेकडे 465 किलोमीटर लक्षद्वीप बेटाजवळ एक अत्यंत सुंदर बेट आहे. त्याचं नाव आहे बंगाराम बेट. हे संपूर्ण बेट निर्जन असून 0.5 चौरस किलोमीटर भागात पसरलेले आहे. या बेटाची निवड खूप विचारपूर्वक करण्यात आली होती. येथे परदेशी नागरिकांच्या येण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. लक्षद्वीपचे तत्कालीन पोलीस प्रमुख पी. एन. अग्रवाल यांच्यानुसार, “बंगाराम बेट अत्यंत सुरक्षित आणि जगापासून एकप्रकारे तुटलेले होते. बेटाच्या भौगोलिक स्थानामुळे येथे सुरक्षित वेळ घालवणे शक्य होते. त्यामुळेच पंतप्रधानांसह त्यांच्या कुटुंबाच्या सहलीसाठी या बेटाची निवड करण्यात आली.”

सहलीचे सर्व नियोजन गुप्त ठेवण्यात आले होते

तत्कालीन पंतप्रधानांच्या या कौटुंबिक सहलीचे सर्व तपशील अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. माध्यमांपासून याची गुप्तता राखण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. तरिही माध्यमांना ही माहिती मिळालीच. माध्यमांना याची माहिती तेव्हा झाली जेव्हा राहुल गांधी आपल्या 4 मित्रांसोबत लक्षद्वीप प्रशासनाच्या नारंगी आणि सफेद रंगाच्या एका हेलिकॉप्टरमध्ये दिसले.

गांधी कुटुंबासह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक लोक सहभागी झाले होते. यात राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या मित्रांचाही गट होता. सरकारने राजीव गांधींच्या सुट्टीची गुप्तता ठेवण्यासाठी त्यावेळी समुद्रावरुन आणि हवाई मार्ग अशा दोन्हीकडून टेहाळणी केली होती.

सोनिया गांधींच्या आईचाही सहभाग

राजीव गांधींच्या या सहलीमध्ये देश आणि परदेशातील अनेक लोक आले होते. कदाचित त्यामुळेच त्यांची ही गुप्त सहल सार्वजनिक झाली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या 4 मित्रांसह सोनिया गांधी यांची बहिण, बहिणीचे पती आणि त्यांची मुले, सोनिया गांधींची आई आर. मायनो, त्यांचा भाऊ आणि मामा देखील सहलीत सहभागी झाले होते.

सहलीमध्ये अमिताभ बच्चन सहकुटुंब सहभागी

पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींवर आरोप करताना केलेल्या आपल्या ट्विटसोबत एक लेखही जोडला आहे. या लेखानुसार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी 1987 मध्ये नव्या वर्षानिमित्त आपल्या कुटुंबासह आणि काही खास मित्रांसोबत एक बेटावर गेले होते. राजीव गांधींच्या या सहलीत त्यांचे खास मित्र आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जया बच्चन आणि 3 मुले होती. मुलांमध्ये अमिताभ यांच्या भावाची (अजिताभ) मुलगी देखील होती. या व्यतिरिक्त आणखी एक कुटुंब या सहलीत होते. ते कुटुंब आहे बिजेंद्र सिंह यांचे. बिजेंद्र सिंह माजी केंद्रीय मंत्री अरुण सिंह यांचे भाऊ होते. या सहलीत 2 परदेशी पाहुणे देखील होते.

राजीव आणि सोनिया 30 डिसेंबरलाच पोहचले

राजीव गांधी आणि सोनिया गांधी सहलीसाठी 30 डिसेंबरला दुपारीच या बेटावर पोहचले होते. अमिताभ बच्चन मात्र एक दिवसानंतर कोचीन-कावारत्ती हेलिकॉप्टरने तेथे आले. जया बच्चन 4 दिवस आधी आपल्या मुलांसह पोहचल्या होत्या.

अमिनाभ बच्चन यांच्या सहभागाविषयी गुप्तता ठेवण्याचा प्रयत्न

बंगाराम बेटावरील सहलीत अमिताभ बच्चन यांच्या सहभागाविषयी गुप्तता पाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, 31 डिसेंबरला बंगारामपासून काही अंतरावर कावारत्ती येथे अमिताभ यांच्या हेलिकॉप्टरचे इंधन संपले. त्यामुळे त्यांना इंधन भरण्यासाठी कावारत्तीला उतरावे लागले. तेथे त्यांना 50 मिनिटे थांबावे लागले आणि बातमी जगजाहीर झाली. दरम्यान, इंडियन एक्सप्रेसच्या एका फोटोग्राफरने अमिताभ बच्चन यांचा फोटो घेतला. त्यावेळी बच्चन यांनी संतापून याचा विरोध केला. यावरुन त्यांचा फोटोग्राफरशी वादही झाला होता.