शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना केलेल्या कामांचा लेखाजोखाच मांडला

| Updated on: Apr 25, 2024 | 11:35 PM

शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना केलेलं एक तरी काम सांगावं, ज्यामुळे देशाचं भलं झालं, असं आव्हान अमित शाह यांनी दिलं होतं. त्यावर शरद पवारांनी आजच्या 'टीव्ही 9 मराठी'च्या मुलाखतीत प्रत्युत्तर दिलं.

शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना केलेल्या कामांचा लेखाजोखाच मांडला
शरद पवार
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत कृषीमंत्री असताना केलेल्या कामांचा लेखाजोखाच मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच अमरावतीत आले होते. त्यांनी यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना केलेलं एक तरी काम सांगावं, ज्यामुळे देशाचं भलं झालं, असं आव्हान अमित शाह यांनी दिलं होतं. त्यावर शरद पवारांनी आजच्या ‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत प्रत्युत्तर दिलं. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली.

“मी कृषीमंत्री झालो त्यानंतरच्या काळात देशात काय घडलं? याचा इतिहास आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतरची तुम्ही आकडेवारी घ्या आणि मी कृषीमंत्री असतानाची शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी घ्या, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढली. ते जे सांगत आहेत, त्यात वस्तुस्थिती नाही. याउलट आत्महत्येच्या घटनांच्या खोलापर्यंत मी गेलो. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मदतीने कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. इतकंच नाही, स्वामिनाथन यांच्या नेतृत्वात कमिशन नेमलं, या कमिशनच्या मदतीने शेतमालाच्या किंमती वाढवल्या.या सगळ्या गोष्टी त्या 10 वर्षात केला. मी जेव्हा शेतकरी खात्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळेस गहू, तांदूळ, साखर ही या देशाला पुरेसी नव्हती. त्यामुळे मी संबंधिची नवी नीती ठरवली. नवीन किंमती दिल्या, योजना दिल्या”, असं शरद पवार म्हणाले.

संविधानमध्ये बदल केला जाईल?

शरद पवार यांना संविधान बदललं जाईल असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्याच्या दाखला दिला. तसेच संबंधित खासदारावर भाजपकडून काय कारवाई करण्यात आली? असा सवाल शरद पवारांनी केला. “संविधानाबद्दल तुमच्यातले (भाजमधील) काही लोक बोलले, त्यांच्यावर तुम्ही काय भूमिका घेतली? गैरसमज नाही, हा समज का झाला? कारण हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे समज यायला बळकती येते”, असं मत शरद पवारांनी मांडलं.