‘राज्यात शरद पवारांइतका जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच बोलतायत’

| Updated on: Oct 20, 2020 | 12:04 PM

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहज कर्ज काढू शकते | Devendra Fadnavis

राज्यात शरद पवारांइतका जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच बोलतायत
Follow us on

उस्मानाबाद: राज्यात शरद पवार यांच्याइतका जाणकार नेता नाही. संकटकाळात केंद्र आणि राज्य सरकारची मदत करण्याची क्षमता आणि नियम हे सर्व शरद पवार यांना नेमके ठाऊक आहे. परंतु, सध्या त्यांच्यावर राज्य सरकारचा बचाव करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे शरद पवार सध्या सरकारच्या सोईसाठी मोजकंच बोलत असल्याची टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis backs Sharad Pawar advice)

देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करत आहेत. आज उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने कर्ज काढण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले. कर्ज काढतोय म्हणजे आपण काही पाप करतो असे नव्हे. अर्थसंकल्पातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी सरकार नेहमीच कर्ज काढते, नंतर त्याची परतफेड करते. संकटाच्या काळात सरकारला कर्ज घ्यावेच लागते. रिझर्व्ह बँकेने नव्याने आखून दिलेल्या मर्यादेनुसार महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची मुभा आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने आपण केवळ 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहज कर्ज काढू शकते, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीस यांनी केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी करणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही फटकारले. एरवी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बरेच मतभेद आहेत. मात्र, केंद्राने मदत द्यावी, या मुद्द्यावर तिन्ही पक्ष एकमताने बोलतात. एकूणच तिन्ही पक्ष हात झटकण्यात तरबेज आहेत. केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत नक्कीच देईल. पण राज्य सरकारने प्रथम आपण काय मदत देणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून उद्धव ठाकरे यांना फोन करुन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला जरुर मदत करेल. त्यासाठी मी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे गेलो तर जास्त मदत मिळेल, असे काहीही नाही. उद्या उद्धव ठाकरे मदतीसाठी पंतप्रधानांकडे गेले तरीही केंद्र सरकार महाराष्ट्राला तितकीच भरघोस मदत देईल, असा दावाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रातही कृषी विधेयकांचे समर्थन केलंय’
शरद पवार यांनी तुळजापूरच्या पत्रकारपरिषदेत शेतकरी कृषी कायद्याला घाबरत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायदा ही शरद पवार केंद्रात सत्तेत असतानाचीच कल्पना असल्याचे सांगितले. त्यांच्याच सरकारने ही कल्पना मांडली होती. शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रातही कृषी कायदा कशाप्रकारे योग्य आहे, हे सांगितल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना अ‍ॅमेझॉन आणि रिलायन्सची भीती वाटते- शरद पवार

(Devendra Fadnavis backs Sharad Pawar advice)