शरद पवारांचा खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचारासाठी उतरला, कौतुक करताना म्हणाला, एका रात्रीत या माणसाने….

सध्या सुरु असलेल्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये अशा अनेक गोष्टी पहायला मिळतायत, ज्यावर मतदारांना विश्वास ठेवणं कठीण आहे. पण असं घडतय. आता शरद पवार यांचा एक विश्वासू खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे.

शरद पवारांचा खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचारासाठी उतरला, कौतुक करताना म्हणाला, एका रात्रीत या माणसाने....
Sharad Pawar-Eknath Shinde
| Updated on: Nov 29, 2025 | 9:52 AM

राज्यात सध्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत चक्रावून सोडणाऱ्यां अनेक युत्या, आघाड्या आकाराला येत आहेत. म्हणजे राज्याच्या, केंद्राच्या राजकारणात परस्परांच्या विरोधात असलेले पक्ष जिल्हा, तालुका पातळीवर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. आता शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गटाच्या ) प्रचाराला हजेरी लावली. शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भरभरुन कौतुक केलं. “राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार व्यक्तिमत्त्व आहे. कुठला पक्ष पाहत नाहीत, काय पाहत नाहीत सढळ हाताने मदत करायची आणि त्याचा मी साक्षीदार आहे” असं धैर्यशील मोहिते पाटील एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना म्हणाले.

“अकलूजला नगरपंचायत करावी म्हणून 46 दिवस साखळी उपोषण केलं आणि एका रात्रीत या माणसाने ( उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ) यांनी उपोषण संपवलं आणि अकलूजला नगरपंचायतीचा दर्जा दिला. साडेपाचशे कोटी रुपये निधी अकलूज नगरपंचायतला दिला. आता तुम्हाला झोळीत भरभरून देणारा माणूस ( उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ) भेटलेला आहे” असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.

दुपारच्या जेवणाला सगळेजण एकाच टेबलावर एकत्र बसतो

“इलेक्शन झाल्यावर राजकारण बाजुला ठेवा. करमाळयाच्या विकासासाठी टाऊन प्लॅन कसा झाला पाहिजे हे बघा. त्याच्यावर चर्चा करुन तुमच्या नगरपालिकेचा ठराव घेऊन शिंदे साहेबांकडे जा. मी सुद्धा दिल्लीला असतो. काही राज्याच्या योजना असतील, काही केंद्राच्या योजना असतील. श्रीकांत शिंदे साहेब आणि मी तिथे एकत्रच असतो. सभागृहात एकमेकांच्या विरोधात भांडतो पण दुपारच्या जेवणाला सगळेजण एकाच टेबलावर एकत्र बसतो” असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं.

स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत मित्रपक्षांचे नेते परस्परांवर टीका करतायत, टोले लगावतायत. या निवडणुकांनंतर जिल्हापरिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका लागतील. त्यावेळी सुद्धा असच चित्र दिसू शकतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत.