छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांना पुन्हा संधी देणार? शरद पवार म्हणाले…

| Updated on: Apr 25, 2024 | 10:56 PM

अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अजित पवार यांना नंतर राजीनामा द्यावा लागला होता. शरद पवार यांनी अजित पवारांना त्यावेळी पुन्हा संधी दिली होती. त्यामुळे शरद पवार यांना छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना पुन्हा संधी देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली.

छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांना पुन्हा संधी देणार? शरद पवार म्हणाले...
शरद पवार आणि छगन भुजबळ यांचा फोटो
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अजित पवार यांना नंतर राजीनामा द्यावा लागला होता. शरद पवार यांनी अजित पवारांना त्यावेळी पुन्हा संधी दिली होती. त्यामुळे शरद पवार यांना छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना पुन्हा संधी देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“आता बघुयात काय होतं ते. मला प्रथमत: वाटत नाही. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत ते परत येतील असं वाटत नाही. हे लोक तोपर्यंत त्याच रस्त्यावर राहणार. परत येण्याचं कारणच नाही. कारण त्यांचं सर्वांचं भविष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

“अजित पवार यांनी 2019 मध्ये आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना सोबत घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं. एखादी गोष्ट आपण दुरुस्त करु शकतो. त्यांनी दुरुस्त करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांनी तिथून राजीनामा देवून परत यावं, या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे त्यांना संधी दिली. त्यानंतर ते दोन वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून राहीले. त्यांच्या हातात सत्ता होती. एजन्सीच्या भीतीने पक्ष फुटला असा तुम्ही निष्कर्ष काढू शकता”, असं शरद पवार म्हणाले.

‘मार्ग काढायचा म्हणजे त्यांच्याशी जमवून घ्या’

“आमचे जे सहकारी गेले त्यापैकी काही सहकाऱ्यांनी मला स्पष्ट सांगितलं की, या चौकशी होतात त्यामुळे आमच्या घरचं वातावरण बिघडतंय. त्यामुळे उद्या आणखी काही झालं तर आम्हाला सहन होणार नाही. यातून काहीतरी मार्ग काढा. मार्ग काढायचा म्हणजे त्यांच्याशी जमवून घ्या. माझे काही सहकारी हे अस्वस्थ होते. त्यांना एजन्सीजचा त्रास होईल, असं वाटत होतं. ते आमच्याशी बोलत होते. त्यामुळे तिकडे जाणं म्हणजे वॉशिंगमशीन, कपडे टाकायचे आणि स्वच्छ करुन बाहेर निघतील, तशी संधी आपल्याला मिळेल, असं काही लोकांचं मत होतं”, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

‘आम्ही त्यांना अनेक पदं दिली’

“ते गेले, ते अनेक वर्ष पक्षाचे काम करत होते. आम्ही त्यांना अनेक पदं दिली. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी काही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केले होते. मी असं एकाचं नाव घेत नाही. पण काही लोकं होती. ते प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर मी मला शक्य नाही, मला योग्य वाटत नाही, असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी हा निर्णय घेतला”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांचा मोठा दावा

“मी त्यांना सांगत होतो की, मी हे करणार नाही आणि तुम्हीदेखील हे करणं योग्य नाही. मला अंदाज आहे की, जी फाईल टेबलवर जाईल ती मोदींच्या विचारांसोबत गेल्यानंतर ती फाईल कपाटात ठेवली जाईल. आता ती समजा नाही. उद्या त्यांना वाटेल तेव्हा ती फाईल कधीही काढली जाईल. त्यामुळे आजचं मरण उद्यावर गेलं, असं वाटलं तर त्यात काही चुकीचं नाही. त्यांच्या डोक्यावर कारवाईची तलवार नेहमी राहील, असं मला वाटतं”, असा मोठा दावा शरद पवारांनी केला.