कोण म्हणतं मी म्हातारा झालो?, तुम्ही काय बघितलं?; शरद पवार यांच्या कोटीवर हशा आणि टाळ्यांचा पाऊस

| Updated on: Oct 24, 2022 | 12:58 PM

आताच एक आमच्या भावकीतील जेजुरीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं मी आता मी बाहेर फिरू नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुठायत ते? आहेत का? कुणी सांगितलं म्हातारा झालो? तुम्ही काय बघितलं?

कोण म्हणतं मी म्हातारा झालो?, तुम्ही काय बघितलं?; शरद पवार यांच्या कोटीवर हशा आणि टाळ्यांचा पाऊस
शरद पवार यांच्या कोटीवर हशा आणि टाळ्यांचा पाऊस
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुरंदर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) आज पुरंदरच्या (purandar) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या (farmer) कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी शरद पवार यांनी मनसोक्त टोलेबाजी केली. एका शेतकऱ्यांने पवारांना या वयात बाहेर फिरू नका, अशी विनंती केली. त्यावर पवारांनी मिश्किल कोटी केली. कोण म्हणतं मी म्हातारा झालो. काय पाहिलं तुम्ही? असा चिमटा शरद पवार यांनी काढला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. इतकंच नाही तर पवारही आपल्या या कोटीवर मनमुराद हसले.

शरद पवार पुरंदरमध्ये आले होते. एका शेतकरी कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. सभेपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं, समस्या ऐकून घेतल्या. यावेळी एका तरुण शेतकऱ्याने पवारांना या वयात बाहेर न फिरण्याची विनंती केली. आमची एक कळकळ आहे. साहेबांनी फिरू नये. एका जागेवरून रिमोट दाबावा. आम्ही जिथे असू तिथून काम करू, असं हा शेतकरी म्हणाला. त्यानंतर झालेल्या सभेत पवारांनी हाच धागा पकडून मिश्किल कोटी केली.

हे सुद्धा वाचा

आताच एक आमच्या भावकीतील जेजुरीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं मी आता मी बाहेर फिरू नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुठायत ते? आहेत का? कुणी सांगितलं म्हातारा झालो? तुम्ही काय बघितलं? काय म्हातारा बितारा झालो नाही. ठिक आहे वय वाढतं, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी करताच एकच खसखस पिकली.

त्यानंतर हा तरुण शेतकरी पुन्हा म्हणाला, साहेब नमस्कार. जेजुरी ग्रामीणच्यावतीने बोलणार आहे. प्रथम तुम्हाला मी दिवाळीची शुभेच्छा देतो. आश्चर्याची गोष्ट अशी की मागील दहा वर्षात तुम्ही माझ्या स्वप्नात दोन वेळा आला आहात. आता मी तुम्हाला माझी समस्या सांगतो… असं हा तरुण म्हणत असतानाच पवारांनी त्याला मध्येच थांबवलं. त्यानंतर पवारांनी आपल्या खास शैलीत या तरुण शेतकऱ्याची फिरकी घेतली. स्वप्न पहाटे पडलं होतं की मध्यरात्री? असा सवाल करताच उपस्थितांमधून हस्याचा बॉम्बच फुटला. आपल्या या कोटीवर पवारही मनापासून हसले. त्यानंतर पवारांनी त्या तरुण शेतकऱ्याला पुढे बोलण्यास सांगितलं.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं आहे. यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण स्वीकारले जात नाही. राज्यातील नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकारला माहिती देणार. पुरंदर तालुक्याचं चित्र बदलत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मी आलो तुम्ही कधी मला मोकळ्या हाताने पाठवलं नाही. तुमची साथ प्रत्येक निवडणुकीत लाभली, असं ते म्हणाले.