6 आमदार आणि 2 खासदार देणाऱ्या कोल्हापूरला शिवसेनेकडून एकही मंत्रिपद नाही!

| Updated on: Jun 16, 2019 | 2:52 PM

राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या बीडमधील जयदत्त क्षीरसागर आणि 2015 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या तानाजी सावंत यांना मात्र थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

6 आमदार आणि 2 खासदार देणाऱ्या कोल्हापूरला शिवसेनेकडून एकही मंत्रिपद नाही!
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदार आहेत. मात्र, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरला शिवसेनेने एकही मंत्रिपद दिले नाही. याउलट राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या बीडमधील जयदत्त क्षीरसागर आणि 2015 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या तानाजी सावंत यांना मात्र थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

कोल्हापुरातील शिवसेनेचे सहा आमदार कोण?

  • प्रकाश आबिटकर – राधानगरी
  • चंद्रदीप नरके – करवीर
  • राजेश क्षीरसागर – कोल्हापूर उत्तर
  • सत्यजित सरुडकर – शाहूवाडी
  • सुजित मिणचेकर – हातकणंगले
  • उल्हास पाटील – शिरोळ

कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन खासदार कोण?

कोल्हापुरात लोकसभेचे दोन मतदारसंघ येतात. यंदा म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेनेने विजय मिळवला.

  • कोल्हापूर – संजय मंडलिक
  • हातकणंगले – धैर्यशील माने

कोल्हापूरकरांची राज्य नियोजन अध्यक्षपदावर समजूत?

कोल्हापूरला मंत्रिमंडळात स्थान दिलं नसलं तरी कोल्हापुरातील कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापूरकरांची एकप्रकारे आयोगाचे अध्यक्षपद देऊन समजूत काढण्याचे प्रयत्न केले आहेत.

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सलग दोन वेळा विधानसभेवर ती निवडून आले आहेत. त्याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेचे सहा आमदार तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन खासदार निवडून दिले आहेत. मात्र त्यामुळे या मंत्रिमंडळात कोल्हापुरात शिवसेनेच्या एका तरी आमदाराला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. या सगळ्यामध्ये राजेश क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी तीन आमदारांची दुसरी टर्म आहे. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर हे दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख पदापासून राजकीय कारकीर्द सुरु केली. विविध आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका घेतली आहे.