मोठी बातमी | कोकणातही उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता, राजन साळवी शिंदे गटात जाण्याची चर्चा!

| Updated on: Aug 19, 2022 | 10:27 AM

कोकणातून दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यानंतर राजन साळवी हे देखील उद्धव ठाकरे गटाची साथ सोडण्याची चिन्हे आहेत.

मोठी बातमी | कोकणातही उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता, राजन साळवी शिंदे गटात जाण्याची चर्चा!
राजन साळवी, शिवसेना आमदार
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः मुंबई, पुणे, मराठवाड्यानंतर आता कोकणातूनदेखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते राजन सावळी हे शिंदे गटात जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवसेनेचे (Shivsena) कोकणात सध्या तीन आमदार आहेत. यात वैभव नाईक, भास्कर जाधव आणि राजन साळवी (Rajan Salvi) यांचा समावेश आहे. यापैकी एक आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या ते संपर्कात असून राज्याचे सध्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान, साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला येत्या काही तासात आणखी एक बंडाला सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पूर्णपणे उध्वस्त झालेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असे म्हटले जातेय.

कोण आहेत राजन साळवी?

कोकणत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेला लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी. सध्या ते शिवसेनेचे उपनेतेही आहेत. कोकणात एकनाथ शिसंदेंसोबत गेलेल्या आमदारांमुळे शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे. आतापर्यंत राजन साळवींनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र तेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला आहे. तर आमदार राजन साळवी यांनी अधिक आक्रमकपणे या प्रकल्पाचं समर्थन केलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत कोकण दौऱ्यावर होते. त्यांनीदेखील रिफायनरीबाबत अनुकूल भूमिका घेतली. या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्मिती होईल, असं मत त्यांनी मांडलं होतं.

हे सुद्धा वाचा

केसरकर, सामंतांनंतर आणखी एक धक्का?

कोकणातून दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यानंतर राजन साळवी हे देखील उद्धव ठाकरे गटाची साथ सोडण्याची चिन्हे आहेत. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विरोधक एकनाथ शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. तेव्हा उदय सामंत यांनीच दावा केला होता, घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांपैकीच काहीजण शिंदे गटात येणार आहेत. राजन साळवी यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली. शिवसेनेत असताना उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात काही वाद होते. मात्र काही काळानंतर वाद कमी झाले. आता उदय सामंत यांच्या शिंदे गटात राजन साळवी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.