प्रत्येकाला वाटतं मी पुन्हा येईन, मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा : संजय राऊत

| Updated on: Oct 23, 2019 | 3:18 PM

अब की बार शिवसेना शंभरी पार करेल, आमच्या थाळीत भरपूर मते पडणार आहेत. महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळतील, याची खात्री वाटतेय, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

प्रत्येकाला वाटतं मी पुन्हा येईन, मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा : संजय राऊत
Follow us on

मुंबई : अब की बार शिवसेना शंभरी पार करेल, आमच्या थाळीत भरपूर मते पडणार आहेत. महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळतील, याची खात्री वाटतेय, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

काँग्रेस राष्ट्रवादीला 80-90 च्या आसपास जागा मिळतील. आमच्यासमोर चांगला विरोधी पक्ष असावा ही आमची भूमिका आहे. विरोधी पक्षनेता पलटी मारणारा असू नये. विचारांशी ठाम असावा, महाराष्ट्राशी प्रामाणिक असावा, शेवटपर्यंत विरोधी पक्षनेता राहावा, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

प्रत्येकाला यंदा बोनस आहे, भाजपच्या 10-20 जागा वाढतील. शरद पवारांनी निवडणुकीत रंगत आणली. ते नसते तर निवडणूक बेचव झाली असती. नक्कीच त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल, असंही राऊत यांनी नमूद केलं.

राष्ट्रवादीची कामगिरी नक्कीच काँग्रेसपेक्षा चांगली राहिली. काँग्रेसकडे नेता नव्हता. त्यांचे नेते स्वतःच्या मतदारसंघात अडकून पडले, असं राऊत म्हणाले.

उदयनराजेंनी लोकांवर निवडणूक लादली. लोकांना गृहीत धरण्याचा परिणाम उदयनराजे यांना दिसेल. यंदा उदयनराजेंनाही निवडणूक कठीण गेली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

मनसे-वंचित या दोन्ही पक्षाचे उमेदवार काही मोजक्या मतदारसंघात लढत देत होते. बिचुकलेला ही वाटते मी जिंकणार. असे बिचकुले गावोगावी आहेत, प्रत्येक पक्षात आहेत.त्यांना वाटतं मीही शेर, असा टोमणा संजय राऊत यांनी मारला.

आदित्य ठाकरेंनी राज्याचं नेतृत्व करावं

वरळीत आदित्य ठाकरे 1 लाख मतांनी निवडून येतील असा मला विश्वास आहे, मतदारांनाही आहे. आदित्य ठाकरे यांची विधानसभेत दमदार एन्ट्री असेल. शिवसेनेच नेतृत्व ते करतातच, राज्याचं नेतृत्व त्यांनी करावे ही आम्हा सर्वांची इच्छा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

मुख्यमंत्र्यानी 5 वर्षे उत्तम कारभार केला आहे. शिवसेनेबरोबर चांगले संबंध ठेवले आहेत. त्यांनी भाजपला राज्यात एक स्थान मिळवून दिलं. प्रत्येकाला वाटतं मी पुन्हा येईन, आम्ही त्यांचे हितचिंतक म्हणून शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांच्याबाबत उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील. शिवसेना भाजप मिळूनच सरकार असेल. भाकितांवर आमचा विश्वास नाही, आम्ही भविष्य घडवतो, असं संजय राऊत म्हणाले.