15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन, वारिस पठाणांना संजय राऊतांचा टोला

15 कोटी सोडा, त्यांच्यामागे 15 जण येऊ द्या, तरीही मी त्यांचा सत्कार करेन, असा टोमणा संजय राऊत यांनी वारिस पठाण यांना लगावला.

15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन, वारिस पठाणांना संजय राऊतांचा टोला
| Updated on: Feb 21, 2020 | 11:33 AM

नवी दिल्ली : एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी आपण 15 कोटी 100 कोटींवर भारी पडू, अशी दर्पोक्ती केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्यांचा समाचार घेतला. त्यांच्यामागे 15 जण आले, तरी मी सत्कार करेन, असा टोला राऊतांनी (Sanjay Raut on Waris Pathan) लगावला.

‘कोण वारिस पठाण? त्यांना विनाकारण महत्त्व दिलं जात आहे. 15 कोटी सोडा, त्यांच्यामागे 15 जण येऊ द्या, तरीही मी त्यांचा सत्कार करेन’ असा टोमणा संजय राऊत यांनी वारिस पठाण यांना लगावला. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

वारीस पठाण काय म्हणाले?

कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात केलेल्या वक्तव्याने वादाला तोंड फुटलं आहे. “आमच्या वाणीच्या आतषबाजीशी ते स्पर्धा करु शकत नाहीत, लक्षात ठेवा माझं वक्तव्य. विटेला दगडाने उत्तर देणं आता आम्ही शिकलो आहोत. मात्र आपल्याला एकत्र येऊन राहिलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळायलाच हवं, जी गोष्ट मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्या. आता वेळ आली आहे. मला म्हणतात आई-बहिणींना पुढे पाठवलं. अरे भाई, आता तर फक्त वाघिणी बाहेर पडल्या आहेत, आणि तुम्हाला घाम फुटला. आता आम्ही सगळे एकत्र आलो, तर काय होईल समजून जा. 15 कोटी आहोत, मात्र 100 वर भारी पडू, लक्षात ठेवा ही गोष्ट’ असं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं होतं.

गीतकार जावेद अख्तर यांनीही वारीस पठाण यांच्यावर सडकून टीका केली. “बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल, तर तुम्ही 15 कोटीच राहाल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला होता.

Sanjay Raut on Waris Pathan