“प्राण कंठाशी आलेल्या लोकांचा वाली कोण? राष्ट्रीय समितीनेच कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा”

| Updated on: May 10, 2021 | 6:51 AM

आपण आजही अश्मयुगात वावरत असल्याचेच दाखवून दिले, अशी टीकाही शिवसेनेनं केली.  (Shivsena Saamana Editorial on BJP Corona Pandemic)

प्राण कंठाशी आलेल्या लोकांचा वाली कोण? राष्ट्रीय समितीनेच कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

मुंबई : देशात सध्या कोरोनाचा जो हाहाकार सुरू आहे तो पाहून सर्वोच्च न्यायालयाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते राजकारणातच गुंतून पडले आहेत. कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. अशावेळी प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण? सर्वोच्च न्यायालयाचे मन द्रवले व त्यांनी कोरोना युद्धासाठी 12 तज्ञांची राष्ट्रीय समिती स्थापन केली. या समितीनेच आता कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा, असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून याबाबतची टीका करण्यात आलेली आहे. (Shivsena Saamana Editorial on BJP Corona Pandemic)

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय? 

देशात सध्या कोरोनाचा जो हाहाकार सुरू आहे तो पाहून सर्वोच्च न्यायालयाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते राजकारणातच गुंतून पडले आहेत. आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा गुंता सोडविण्यात ते मग्न होते. प. बंगालला ममता यांनी विजय मिळविला असला तरी त्यांचे राज्य त्यांना नीट चालवू द्यायचे नाही त्यासाठीच्या कारस्थानी कारवायांत वेळ निघून जात आहे. अशावेळी प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण? सर्वोच्च न्यायालयाचे मन द्रवले व त्यांनी कोरोना युद्धासाठी 12 तज्ञांची राष्ट्रीय समिती स्थापन केली. या समितीनेच आता कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

भाजपची गोबेल्स यंत्रणा काय बोलणार आहे? 

कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘टास्क फोर्स’ची स्थापना करून केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला आहे. यावर आता भारतीय जनता पक्षाची गोबेल्स यंत्रणा काय बोलणार आहे? देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालीत आहे. औषधे, लसीकरण, राज्याराज्यांत होणारा प्राणवायूचा पुरवठा याबाबत रोजच गोंधळाचे चित्र समोर येत आहे. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्राणवायू, बेडस् मिळत नाहीत म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयांनी जणू कोरोना निवारण, प्राणवायू, बेड वाटपाचेच कार्य हाती घेतले.

शेवटी न्यायालयाने याप्रश्नी एका राष्ट्रीय समितीचे गठन करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. राष्ट्रीय स्तरावरील 12 तज्ञांचा यात समावेश असून त्यात डॉ. झरीर उदवाडिया व डॉ. राहुल पंडित या दोन मुंबईकर तज्ञांचा समावेश आहे. अशा एखाद्या राष्ट्रीय समितीची स्थापना मोदी सरकारला याआधीच करता आली असती, तशी मागणीही अनेकांनी केली. बिगर भाजपाई सरकार केंद्रात असते तर मुडद्यांच्या राशी व पेटलेल्या चिता पाहून त्यांचे मन द्रवले असते व कोरोनाप्रश्नी एखाद्या राष्ट्रीय सरकारची स्थापना करून मोकळे झाले असते, पण विद्यमान दिल्लीश्वरांना हे असे कोणी सुचवायचे म्हणजे स्वतःला मूर्ख किंवा देशद्रोही ठरवून घ्यायची तयारी ठेवायची. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची घोषणा केली. प्राणवायू, औषधपुरवठय़ाबाबत एक तटस्थ यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी या राष्ट्रीय समितीवर टाकली आहे. केंद्राने अशा प्रकारची समिती स्थापन केली असती तर परिवारातले 112 तज्ञ त्यात नेमून गोंधळात भरच टाकली असती, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मेंदूलाही झिणझिण्या

त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने हे काम केले ते बरे झाले. देशात लाखो रुग्ण प्राणवायूअभावी तडफडत आहेत, प्राण सोडत आहेत. प्राणवायूचे टँकर्स परस्पर पळवण्याची डाकूगिरी अनेक राज्यांत होत आहे. लसी, औषधांची दिवसाढवळय़ा वाटमारी सुरू असतानाच देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे ‘विनामास्क’ रस्त्यावर उतरून प. बंगालमधील हिंसाचाराविरोधात निदर्शने करताना दिसतात, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या मेंदूलाही झिणझिण्या आल्या असतील. कारण हे महाशय सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. कोरोना संकट बिकट बनल्याचे आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या जणू खिजगणतीतही नसावे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या आरोग्य मंत्रालयास झोपेचे संपूर्ण इंजेक्शन देऊन राष्ट्रीय समितीवर कोरोना युद्धाची जबाबदारी सोपविली आहे.

अशाच प्रकारची एक राष्ट्रीय समिती म्हणजे ‘टास्क फोर्स’ युरोपातील देशांतसुद्धा नेमण्यात आला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ब्रिटन संपूर्ण कोरोनामुक्त झालेला असेल, असा दावा ब्रिटनच्या लसीकरण टास्क फोर्सचे मावळते अध्यक्ष फ्लाइव्ह डिक्स यांनी केला आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रसार थांबलेला असेल, असा ब्रिटनच्या ‘टास्क फोर्स’ प्रमुखांचा दावा आहे. आमच्याकडे काय झाले? ‘महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले; कोरोनाला आम्ही 21 दिवसांत हरवू’, वगैरे डोस देण्याच्या प्रयत्नात युद्धावरील पकडच सुटली. गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होतो असे ‘डोस’ देण्यात आले. 30 सेकंद श्वास रोखून धरल्याने संसर्गापासून बचाव होतो असे प्रसारित करून आपण आजही अश्मयुगात वावरत असल्याचेच दाखवून दिले, अशी टीकाही शिवसेनेनं केली.

संकटकाळात कोणी काय निर्णय घ्यायचे याबाबत संभ्रम

हा देश साप, विंचू, हत्ती, गारुडी लोकांचा आहे, अशी बदनामी विदेशात होत असे. ते गारुडी आणि पुंगीवाले आज सत्तेच्या टोपल्यांवर बसून पुंग्या वाजवीत आहेत आणि लोकांना डोलायला लावीत आहेत. त्या पुंगीवादातून नवा पुंजीवाद देशात निर्माण झालाय व तो पुंजीवादही देशाला कोरोनापासून मुक्ती देऊ शकला नाही. संकटसमयी तरी राज्यकर्त्यांनी विशाल मनाचे दर्शन घडवायचे असते. नाहीतर देश व प्रजा संकटात येते. राजधानी दिल्लीत आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा ढाचाच उद्ध्वस्त झाला आहे. तेथे लोकनियुक्त सरकारचे सगळे अधिकार केंद्राने काढून घेतले. त्यामुळे या संकटकाळात कोणी काय निर्णय घ्यायचे याबाबत संभ्रम आहे, असेही शिवसेनेनं यात म्हटलं आहे.  (Shivsena Saamana Editorial on BJP Corona Pandemic)

संबंधित बातम्या : 

कोरोनाचे नवे प्रकार आणि लाटांपासून वाचण्याचे 2 उपाय, वाचा तज्ज्ञ काय सांगतात?

एक रेमडेसिवीर इंजेक्शन 35 हजारात, रुग्णालयाच्या वॉर्डबॉयकडूनच काळाबाजार, पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश