हिंदुत्वाशी काडीचा संबंध नसलेले भाजपमधील बाजारबुणगे आणि उपरे श्रेयवादाचा गोंधळ घालतायत: शिवसेना

| Updated on: Nov 19, 2020 | 7:47 AM

कुणीतरी एक बोगस 'आचार्य' पुढे करुन मंदिरांचे टाळे उघडा यासाठी आंदोलन केले. कोण कुठले आचार्य? | Shivsena

हिंदुत्वाशी काडीचा संबंध नसलेले भाजपमधील बाजारबुणगे आणि उपरे श्रेयवादाचा गोंधळ घालतायत: शिवसेना
Follow us on

मुंबई: राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर भाजप नेत्यांकडून सुरु असलेल्या आनंदोत्सवावर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. हिंदुत्वाशी काडीमात्र संबंध नसलेले भाजपमधील बाजारबुणगे आणि उपरे श्रेयवादाचा गोंधळ घालत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे याचे भान ठेवले नाही तर राज्यात त्यांचे हसे होईल, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून सांगण्यात आले आहे. (Shivsena criticise BJP over temple politics)

‘सामना’तील या अग्रलेखात भाजप आमदार राम कदम, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांना नाव न घेता सणसणीत टोले लगावण्यात आले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. मात्र, सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरु करुन भाजपमधील ‘उपऱ्यां’नी विजयोत्सव सुरु केला.

मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दारी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वैगैरे लावत पोहोचले. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

कुणीतरी एक बोगस ‘आचार्य’ पुढे करुन मंदिरांचे टाळे उघडा यासाठी आंदोलन केले. कोण कुठले आचार्य? पण भाजपला फुकटात नाचायला लोक मिळतात. ते भाड्याने वापरुन महाराष्ट्र सरकारच्या नावाने शिमगा करायचा हा भाजपचा रिकाम्या वेळेतला उद्योग झाला आहे, असा टोलाही शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात जनतेच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्वच प्रार्थनास्थळे बंद होती. हे सर्व केंद्र सरकारच्या सुचनांनुसारच घडत होते. त्यामुळे भाजपमधील उपऱ्या हिंदुत्ववाद्यांनी मंदिरे उघडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोरच आंदोलन करायला हवे होते. दिल्लीतील जंतरमंतर रोड, रामलीला मैदान, विजय चौकात घंटा आणि थाळ्या वाजवून मंदिरे उघडा असे पंतप्रधान, राष्ट्रपतींना सांगता आले असते, पण त्यांनी ढोल-ताशे वाजवले महाराष्ट्रात. भाजपच्या या बिनबुडाच्या आणि लोकांना चिथवण्याच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

‘हिंदू सणांवर बंदी हा महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोगाम असेल, पण ईश्वराने त्यांना सद्बुद्धी दिली’

चित्रगुप्तानेही पाप-पुण्याचा हिशेब मांडताना महाविकास आघाडीला शाप दिले असतील: राम कदम

महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे 9 महिन्यांनी उघडले, भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण

(Shivsena criticise BJP over temple politics)