
ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे (mp shrikant shinde) यांचा वाढदिवस ४ फेब्रवारी रोजी होता. त्यानिमित्त त्यांच्यावर विविध ठिकाणांवरुन शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोस्टर्स पाहायला मिळाले. तसंच ठाणे शहरातही (Thane City) पोस्टर्स लागले होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. परंतु त्यांच्या वाढदिवसावरुन आता राजकारण (Politics) रंगणार असल्याची चिन्ह आहेत. त्यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा झाला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपरोधिक टीका केली आहे.
श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस नौपाडा पौलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यात केक कापण्यात आला. उपायुक्त गणेश गावडे यांनी त्यांना केक भरवला. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रसने टीका केली आहे.
काय म्हणाले आनंद परांजपे
श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात केक कापण्यात आला. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्यात स्तुत्य उपक्रम झाला. केक कापण्यात आला. केक एकमेकांना भरवण्यात आला. गणवेश वाटप झाले. यामुळे पोलीस महासंचालक रजनीश शेठ व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहिणार आहे. या पत्रात पोलीस ठाण्यात सर्वच राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत अगदी चोखपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या याच कर्तव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला काल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या वतीने नौपाडा येथील पोलीस बांधवांना गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले pic.twitter.com/9A6duz8GOe
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) February 4, 2023
गणवेशाचा खर्च वाचणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले, की पोलिसांना गणवेश वाटप सरकारकडून केले जाते. त्यांना त्यासाठी धुलाई भत्ताही दिला जातो. त्यांच्या सर्व्हीस बुका हे दिले आहे. परंतु राजकीय नेत्यांकडून गणवेश मिळत असतील तर राज्य सरकारचा खर्च वाचेल. यामुळे सरकारने पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणे व गणवेश वाटप करण्याची परवानगी द्यावी. म्हणजे राष्ट्रवादी पक्ष ठाणे शहरात हा उपक्रम राबवेल. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस इतर ठिकाणी हा उपक्रम राबवणार, असा टोला त्यांनी लगावला.
पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न
पोलीस ठाण्यात झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक ठाणेकरांचा मनात हा प्रश्न असणार आहे. आपण एखादा राजकीय पक्षाच्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करतो, गणवेश घेतो तेव्हा शहरातील नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणार, हे निश्चित, असे आनंद पराजपे यांनी सांगितले.
श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानंतर ९ फेब्रवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. ठाणे शहरात मोठा धडाक्यात साजरा करण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.