भाजपला पाठिंबा देणारे काही अपक्ष आमदार आता शिवसेनेच्या संपर्कात

| Updated on: Nov 11, 2019 | 4:00 PM

राज्यात सत्तास्थापनेची गणितं जशी बदलत आहेत तसे अनेकांचे राजकीय मित्रही (BJP supporter Independent MLA) बदलत असल्याचं दिसत आहे.

भाजपला पाठिंबा देणारे काही अपक्ष आमदार आता शिवसेनेच्या संपर्कात
Follow us on

मुंबई: राज्यात सत्तास्थापनेची गणितं जशी बदलत आहेत तसे अनेकांचे राजकीय मित्रही (BJP supporter Independent MLA) बदलत असल्याचं दिसत आहे. हा नियम केवळ प्रमुख पक्षांनाच नाही तर अगदी अपक्षांनाही लागू होत आहे. भाजप सत्तेत येणार असं दिसत असताना भाजपला पाठिंबा देणारे काही अपक्ष आमदार (BJP supporter Independent MLA) आता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांनी सत्तेची दिशा लक्षात घेऊन हालचाली सुरु केल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यानंतर अपक्ष आमदारांपैकी अनेकांनी भाजपला पाठिंबा देत भाजपच्या गोटात जाणे पसंत केले. मात्र, मागील 18 दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यात भाजप मागे पडला आहे. भाजपने स्वतः राज्यपालांनी विचारणा केल्यानंतर सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा केली आहे. त्यामुळे भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही आता बदललेल्या स्थितीचा अंदाज घेऊन शिवसेनेच्या गोटात येण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित अपक्ष आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचीही माहिती समोर येत आहे. आतापर्यंत भाजपला पाठिंबा देणाऱ्या 2 अपक्ष आमदारांनी शिवसेनेशी संपर्क साधला आहे. सध्या 8 अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यात आता नव्याने पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे.