होय, मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाली, प्रताप सरनाईकांबाबत लवकरच बातमी मिळेल: संजय राऊत

| Updated on: Jun 26, 2021 | 3:38 PM

Sanjay Raut | प्रताप सरनाईकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्हाला जाणवलं काही केंद्रीय यंत्रणा जाणुनबुजून 'वडाचं साल पिंपळाला' लावण्याच प्रयत्न करत आहेत.

होय, मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाली, प्रताप सरनाईकांबाबत लवकरच बातमी मिळेल: संजय राऊत
प्रताप सरनाईक आणि संजय राऊत
Follow us on

मुंबई: प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हा महत्वाचा खुलासा केला. (Shivsena MP Sanjay Raut meets CM Uddhav Thackeray at Matohsree)

त्यांनी सांगितले की, प्रताप सरनाईकांशी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो, त्यांनी खुलासा केला, मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करत असताना सरनाईकांनी स्पष्टपणे सांगितलं मी आजन्म शिवसेनेतच राहीन, आणि शिवसेनेतच मरेन. प्रताप सरनाईकांबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे राऊत यांनी म्हटले.

ईडीच्या कारवाईवर आमचं लक्ष आहे. केंद्रीय पातळीवर दबाव असू शकतो. प्रताप सरनाईकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्हाला जाणवलं काही केंद्रीय यंत्रणा जाणुनबुजून ‘वडाचं साल पिंपळाला’ लावण्याच प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे राऊत यांनी सांगितले.

सरकार टिकेलही, मुख्यमंत्रीही आमचाच राहील: शिवसेना

पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. आज माझी चर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संघटनात्मक बांधणीबाबत झाली. संघटना बळकट असेल तर सरकार आहे त्यापेक्षा मजबूत होईल, सरकारी प्रदीर्घ काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. त्यासाठी संघटनात्मक चर्चा झाली. अनेक विषय महाराष्ट्रात सुरु आहे, मुख्यमंत्री रिलॅक्स आहेत, विधानसभा अधिवेशनाची त्यांची तयारी सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले.
दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा चर्चा होते. आज पक्षप्रमुख आणि मी कार्यकर्ता म्हणून भेटलो. त्यावेळीही राजकीय चर्चा होते. त्यामध्ये बाहेर चर्चा व्हावी असं काही नाही. सर्वकाही सुरळीत आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या, ढोल बडवले, तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याची खात्री देतो, असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘शरद पवारांच्या भूमिकेत काहीही गैर नाही’

शरद पवार यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. शरद पवारांचा एक मेसेज होता, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, त्यांची लोकप्रियता वाढत आहे, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.

तिसऱ्या आघाडीत शिवसेना-काँग्रेस असावी असं पवार म्हणाले त्यात चूक नाही. आज आम्ही यूपीएत नाही आणि एनडीएतही नाही. देशपातळीवर विरोधी पक्षांची भक्कम आघाडी पर्याय म्हणून उभी राहात असेल, तर पवारांच्या भूमिकेत चूक नाही, असे राऊत यांनी म्हटले.

शरद पवारांनी प्रशांत किशोरांना भेटावं की आणखी कोणाला भेटावं हा त्यांचा प्रश्न. पवारसाहेब देशातील महत्त्वाचे नेते आहेत. लोकशाहीत विरोधी पक्षांची ताकद वाढेल तेव्हढा सरकारवर अंकुश राहील, असेही राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नाही, पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं ट्वीट

‘कर नाही, तर डर कशाला, वड्यांचं तेल वांग्यावर कशाला काढता’, दरेकरांचा राऊतांना टोला

(Shivsena MP Sanjay Raut meets CM Uddhav Thackeray at Matohsree)