काँग्रेसचं इंजिन बंद पडलं आहे, सहा अध्यक्षांच्या धक्क्याने ते सुरु होणार नाही : मुनगंटीवार

काँग्रेसचं इंजिन बंद पडलं आहे. एक अध्यक्ष ठेवा किंवा पाच कार्याध्यक्ष ठेवा. सहा लोकांनी मिळून काँग्रेसच्या गाडीला धक्का मारण्याचा प्रयत्न केला, तरी ते इंजिन सुरु होणार नाही. आता ही गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेने जाऊ शकत नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

काँग्रेसचं इंजिन बंद पडलं आहे, सहा अध्यक्षांच्या धक्क्याने ते सुरु होणार नाही : मुनगंटीवार
| Updated on: Jul 15, 2019 | 3:10 PM

वर्धा : काँग्रेसचं इंजिन बंद पडलं आहे. एक अध्यक्ष ठेवा किंवा पाच कार्याध्यक्ष ठेवा. सहा लोकांनी मिळून काँग्रेसच्या गाडीला धक्का मारण्याचा प्रयत्न केला, तरी ते इंजिन सुरु होणार नाही. आता ही गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेने जाऊच शकत नाही, असं म्हणत काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षसह कार्यकारी अध्यक्षांच्या नियुक्त्यांवर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोचरी टीका केली.

काँग्रेसने कितीही स्वप्न बघितली तरी पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार, असंही मुनगंटीवार म्हणाले. इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि फक्त मोदी हटावचा नारा देऊन त्यांनी निवडणुकीत प्रचार केला. आम्ही देश बचाव, देशाच्या प्रगतीचा नारा देतो आणि तुम्ही मोदी हटावचा नारा देता. 47 वर्षांत तुम्ही कोणती विकासकामं केली. केली असेल तर ती जनतेपुढे आणा, असं म्हणत मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षाला आव्हानच दिलं. विकासकामं करायची नाही आणि टीका करायची, जनतेपुढे मला पाहा फुलं वाहा म्हणत जायचं, आता हे शक्य नाही. जनतेला हे माहीत आहे. त्यामुळे काँग्रेस आता पुढे जाऊ शकत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

मुख्यमंत्री हा महायुतीचाच

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आमचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत आहे. यातच आता मुनगंटीवारांनीही उडी घेत मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असं सांगितलं. तसेच शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर समान वाटप होईल. जागा वाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करून मुख्यमंत्री ठरवू, असंही सांगितलं.

वर्धा जिल्ह्याच्या सेलू येथे नवीन बसस्थानाकाचे भूमिपूजन सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार पंकज भोयर, खासदार रामदास तडस हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार यांनी  राज्याला दरवर्षी नवीन बसगाड्या उपलब्ध केल्या जाणार असून  वर्धा जिल्ह्याला यावर्षी नव्या कोऱ्या 50 बसगाड्या उपलब्ध केल्या जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही आता नव्या कोऱ्या गाडीत फिरणार असल्याची घोषणा केली.

बसस्थानकाच्या कामाचे भूमिपूजनासोबतच वृक्ष लागवड कार्यक्रमही राबवण्यात आला. 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम चांद्यापासून बांद्यापर्यंत राबवताना जेव्हाही झाड लावले, तेव्हा पावसाची कृपा झाली. आजही या शहरात भर भरून पाऊस बरसू दे. आमच्या चार कार्यक्रमावर पाणी फेरले तरी चालतील. पण, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ दे, अशी प्रार्थना यावेळी मुनगंटीवारांनी केली.

सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तयारीत

ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही. जिथे पाऊस कमी पडला, तिथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यासाठी विभागाचा अभ्यास सुरू असून आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती मुनगंटीवारांनी दिली.

तर अनेकदा विमानातून प्रवास करताना किती सोयीसुविधा असल्याचे जाणवत होते. मात्र कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेला बसस्थानकावर गेले असता सध्या सुविधा मिळतं नव्हत्या. विमानाने रोज 1 लाख लोक प्रवास करतात. त्यांना इतक्या सुविधा दिल्या जाते. पण सामान्य कष्टकरी 68 लाख लोक जे बसने प्रवास करतात त्याना सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे अर्थमंत्री होताच महाराष्ट्रातील बस्थानाकला निधी देण्याचे ठरवले. आज 659 पैकी 175 बस्थानकांची काम सुरू झाली असल्याचं, त्यांनी सांगितले.

लाल दिव्याची गाडी ही आज आहे, उद्या नाही. मंत्रीपद येत जात राहतं, पण लाल रक्ताची माणसं अतिशय महत्त्वाची आहेत. मागील साडे चार वर्षांत जिल्ह्याच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. यामुळे पालकमंत्री नसलो तरी हे अतूट नाते निर्माण झाले आहे. कधीही आठवन, करा मी तुमच्या पाठीशी राहणार यात शंका नाही, आठवण करा, पण अशी करा की मंत्रालयात बसून असलो, तरी उचकी लागली पाहिजे, असं मुनगंटीवांनी वर्धेकरांना सांगितलं.