Supriya Sule : ‘महिलेवर हात उगाराल तर हात तोडून हातात देईन’, सुप्रिया सुळेंचा रुद्रावतार; फडणवीस म्हणातात, ‘तर त्यांचे स्वागत करु’

महिला कार्यकर्त्यावर हात उचलला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं. 'यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन', असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिलाय.

Supriya Sule : महिलेवर हात उगाराल तर हात तोडून हातात देईन, सुप्रिया सुळेंचा रुद्रावतार; फडणवीस म्हणातात, तर त्यांचे स्वागत करु
सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 11:07 PM

जळगाव : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या सोमवारच्या पुणे दौऱ्यात मोठा राडा पाहायला मिळाला. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. तसंच बांलगंधर्व रंगमंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थित भाजपचा कार्यक्रम सुरु असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी  (NCP women activists) गोंधळ घातला. त्यावेळी या कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन जात होते, त्याचवेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून इराणी यांच्या गाडीवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. तसंच काळे झेंडेही दाखवण्यात आले. या प्रकरणानंतर दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, महिला कार्यकर्त्यावर हात उचलला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं. ‘यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन’, असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिलाय. त्या जळगावात बोलत होत्या.

सुप्रिया सुळे संतापल्या

पुण्यात स्मृती इराणी यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय कारकिर्दीची माहिती देणारं पुस्तक प्रकाशन होणार होतं. दिवसभराच्या राड्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे इराणी यांचा कार्यक्रम काही वेळ थांबवण्यात आला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं. त्यांना तिथून बाहेर काढत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. या प्रकरणावर सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या.

‘…तर हात तोडून हातात देईन’

भाजप पक्षातील एक कार्यकर्ता महिलेवर हात उचलतो, त्या पक्षाला लाच वाटली पाहिजे. महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपनं पक्षातून काढायला हवं. असे कृत्य महाराष्ट्रात कधीही झालं नाही. भाजपनं महाराष्ट्रात हे कृत्य केलं आहे. भाजपकडून महिलांवर अन्याय होत राहिल्यास आम्ही त्यांना आमच्या भाषेत उत्तर देऊ. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. काल महिलेच्या अंगावर एकदा हात उगारला, पुन्हा उगारू नका. कारण आता अती झालं आहे. बेटी बचाव बेटी पढाओ संस्कृती सांगणाऱ्यांची ही संस्कृती आहे का? माझ्या महिला कार्यकर्त्याने चूक केली असती तर मी स्वत: स्मृती इराणी यांची माफी मागितली असती. त्यांना माफी मागण्यात काही कमीपणा नव्हता. जे चूक आहे ते चूक आहे. एखादी घोषणा दिल्यानं हात उगारला जातो हाच यांचा पुरुषार्थ आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. त्याचबरोबर यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना खोचक आवाहन

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या इशाऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आलं. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, सुप्रियाताईंनी सर्वच बाबतीत असा निर्णय घ्यायला हवा. यापूर्वी नवनीत राणा यांच्यासोबत जे काही झालं, त्याबाबत सुप्रिया सुळे काहीच बोलल्या नाहीत. यापूर्वी जेव्हा जेव्हा महिलांवर हल्ले झाले त्यावेळी सुप्रियाताई काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे सुप्रियाताईंनी महिलांबाबत अशी भूमिका वारंवार घेतली तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय.