Tamilnadu Election 2021 : पलानीस्वामींवरील आक्षेपार्ह टीका ए. राजांना भोवली, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

| Updated on: Apr 01, 2021 | 6:31 PM

एका आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने DMKचे नेते आणि माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

Tamilnadu Election 2021 : पलानीस्वामींवरील आक्षेपार्ह टीका ए. राजांना भोवली, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
DMK नेते ए राजा यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
Follow us on

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशास्थितीत एका आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने DMKचे नेते आणि माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरुन त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत होती. ए. राजा यांनी या प्रकरणी दिलगिरीही व्यक्त केली आहे. (Election Commission takes major action against DMK leader A Raja)

ए. राजा यांच्यावर प्रचारबंदी

ए. राजा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्यानंतर ए. राजा यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आलीय. त्यांना DMKच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. इतकच नाही तर दोन दिवस त्यांच्यावर प्रचारबंदीही लागू करण्यात आली आहे. 6 एप्रिल रोजी तामिळनाडूमध्ये मतदान होणार आहे. अशावेळी निवडणूक आयोगाच्या कारवाईमुळे ए. राजा यांना आता दोन दिवसच प्रचार करता येणार आहे. त्यामुळे DMKला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीय.

स्टालिनच्या चप्पलसोबत पलानीस्वामींची तुलना

ए राजा यांनी एका प्रचारसभेत “डीएमकेचे सर्वेसर्वा एमके स्टालिन आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या तुलना केली. स्टालिन याचं राजकीय करिअर पाहता त्यांचा जन्म योग्यरित्या झाला आहे. पण पलानिस्वामी यांच्याकडे पाहून असं वाटतं की ते अयोग्य नात्यातून जन्माला आलेले प्रिमॅच्युअर चाईल्ड आहेत”, अशी आक्षेपार्ह टीका केली होती.

इतकच नाही तर ए राजा यांनी पलानीस्वामी यांची तुलना एमके स्टालिन यांच्या चपलेशी केली होती. राजा यांनी म्हटलं की, पलानीस्वामी यांची किंमत एमके स्टालिन यांच्या चपलेपेक्षाही कमी आहे. ए राजा यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येऊ लागला.

‘जो महिलेचा अनादर करतो त्याला देव शिक्षा देतो’

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हे ए राजा यांनी केलेल्या अपमानकारक टीकेनंतर भावूक झालेले पाहायला मिळाले. “समाजात एका आईचं स्थान किती महत्वाचं असतं. जो कोणी महिलेचा अनादर करतो त्याला देव शिक्षा देतो”, अशा शब्दात पलानीस्वामी यांनी ए राजा यांच्या टीकेला उत्तर दिलं.

संबंधित बातम्या : 

Tamilnadu Election 2021 : पलानीस्वामींवरील अवमानकारक टीकेनंतर ए राजा यांना उपरती, मागितली जाहीर माफी!

Tamilnadu election 2021 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींपुढे झुकतात तेव्हा वाईट वाटतं – राहुल गांधी

Election Commission takes major action against DMK leader A Raja